अमरावती : एकीकडे आपण डिजीटल युगात वावरत आहोत, मात्र काही जणांच्या मानगुटीवरचं अंधश्रद्धेचं भूत काही केल्या उतरायला तयार नाही. अंधश्रद्धेचा वारसा पुढे चालवावा यासाठी उच्चशिक्षित सुनेला दीड वर्ष डांबून ठेवत छळ केल्याचा धक्कदायक प्रकार अमरावतीत समोर आला आहे.

याबाबत सुनेनं तक्रार दाखल करुनही पोलिसांनी कोणालाही अटक केली नाही.

पीडित विवाहितेची सासू निर्मला तळोकार ही अंगात देवी संचारत असल्याचं ढोंग रचते. त्याआधारे तिने अनेकांना गंडवून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळले आहेत. आता आपला हा वारसा पुढे चालावा यासाठी तळोकार कुटुंबियांनी आपल्या सुनेला त्रास द्यायला सुरुवात केली.

यवतमाळच्या वडगाव येथील अमोल जयराम तळोकार या मुलाशी 18 डिसेंबर 2016 ला विवाह झाला. विवाह झाल्यावर तीन महिन्यातच तिला त्रास देणं सुरु झालं.

अमोलने सर्वात अगोदर आपल्या पत्नीचं सिमकार्ड तोडलं. बाहेर जाण्याची मुभा नाही. बंद खोलीत घराचं दार बंद आणि फाटकाला कायम कुलूप... याबद्दल माहेरी सांगितल्यास आई-वडिलांना जीवे मारुन टाकण्याची धमकी दिली जायची.

घरचा वारसा म्हणून यापुढे 'अंगात देवी आणल्यासारखं कर, कारण तुझा नवरा काहीच कमवत नाही. त्यामुळे हे सगळं आता तू सांभाळं असं सासूने 12 जानेवारी 2017 ला सांगितलं. पीडितेने ही सगळी अंधश्रद्धा आहे, मी हे नाही करणार असं खडसावून सांगताच नरकयातना सुरु झाल्या.

नवरा, दोघी नणंदा, सासू हे सगळे तिला रोज शारीरिक आणि मानसिक त्रास द्यायचे. विशेष म्हणजे सुनेचं एमए डीएडपर्यंत शिक्षण झालेलं आहे.

पीडितेची सासू निर्मला जयराम तळोकार अंगात देवी येण्याचा देखावा करायची. अंगारा देणे, जिभेवर कापूर जाळणे, लिंबू देणे, आजारी व्यक्तीच्या शरीरावर हात ठेवून स्वतःच्या तोंडातून रक्त काढणे ही तिची लुबाडणुकीची पद्धत. त्यापोटी पैसे, धान्य, दागिने, महागड्या साड्या अशा विविध भेटवस्तू ती मिळवायची.

पीडित महिलेनं मोठ्या हिमतीने अत्याचाराला वाचा फोडली. अमरावतीच्या पोलीस आयुक्तांकडे याबाबत तक्रार दिली.  याप्रकरणी दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हे असूनही अटक मात्र कुणालाच झाली नाही.