सिंधुदुर्ग : सह्याद्रीतील 'संवर्धन राखीव वनक्षेत्रा'मध्ये पट्टेरी वाघाचे वन विभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात बुधवारी रात्री छायाचित्र टिपण्यात आले. सह्याद्रीमधील वनक्षेत्रांना 'कॉन्झर्वेशन रिझर्व्ह'चा दर्जा दिल्यानंतर पहिल्यांदाच आंबोलीच्या हिरण्यकेशी भागामध्ये वाघाच्या अस्तित्वाचा पुरावा मिळाला आहे. सह्याद्री पट्ट्यात कोयना राधानगरी चांदोली अभयारण्याच्या लगत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली ते तिलारी पर्यतच्या जंगलाला 'कॉन्झर्वेशन रिझर्व्ह'चा दर्जा मिळाल्यानंतर पट्टेरी वाघाला ट्रॅप कॅमेऱ्याने टिपले आहे. गेल्या दोन दिवसापूर्वीच आंबोली येथील एका शेतकऱ्यांच्या गाईचा फडशा या पट्टेरी वाघाने पडला होता.
दोन दिवसापूर्वीच आंबोली मधील हिरण्यकेशी भागातील एका शेतकऱ्याच्या गाईचा फडशा पट्टेरी वाघाने पाडला, असं ग्रामस्थांनी वनविभागाला सांगितले. मात्र, ग्रामस्थांच्या म्हणण्याकडे वनविभागाकडून कानाडोळा करण्यात आला होता. परंतु, हिरण्यकेशी जंगल भागात लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यात पट्टेरी वाघ टिपला गेला. त्यामुळे आंबोलीत पट्टेरी वाघ असल्याचे स्पष्ट झालं. सह्याद्री पट्ट्यात राधानगरी ते तिलारी घाट परिसरात जे कोल्हापूर सिंधुदुर्ग या सह्याद्रीच्या जंगल भागात पट्टेरी वाघ फेरफटका मारत असल्याचे वनखात्याने स्पष्ट केले आहे. गेल्या वर्षी ब्लॅक पँथर आंबोलीच्या जंगलात पर्यटकांना दिसला होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारीच्या जंगलात पाच ते आठ वाघाचे अस्तित्व असल्याचं वन अभ्यासकांच मत आहे.
राज्य सरकारने सह्याद्रीमधील वनक्षेत्रांना 'कॉन्झर्वेशन रिझर्व्ह'चे संरक्षण दिले. यामध्ये सिंधुदुर्गमधील आंबोली-दोडामार्ग (5,692 हे) आणि तिलारी कॉन्झर्वेशन रिझर्व्हचा समावेश आहे. या वनपट्ट्यांना संरक्षण दिल्यामुळे सह्याद्रीमधील वन्यजीव आणि खास करुन वाघांचा भ्रमणमार्ग सुरक्षित झाला असून 'कॉन्झर्वेशन रिझर्व्ह' वनक्षेत्रामध्ये वाघाचा वावर आढळून आला आहे.