औरंगाबाद : औरंगाबादच्या छावणी परिसरातील 250 पेक्षा अधिक नागरिकांना गॅस्ट्रोची लागण झाल्याचं समोर आलं आहे. रात्री उशिरापर्यंत एकापोठापाठ एक शेकडो रुग्ण छावणीतील सामान्य रुग्णालयात दाखल झाले. रुग्णांच्या संख्येमुळे थेट जमिनीवर उपचार घेण्याची वेळ अनेकांवर आली.


छावणीतील विविध भागांतील अनेक नागरिकांना मध्यरात्रीनंतर अचानक पोटदुखी, जुलाब आणि उलट्यांचा त्रास सुरू झाला. पाहता पाहता या त्रासाने संपूर्ण छावणी परिसराला वेढा घातला. लहान मुले, महिला-पुरुष, युवक-युवती, ज्येष्ठ अशा सर्वांना या आजाराने वेढले असल्यामुळे उपचारासाठी नागरिकांनी छावणी सामान्य रुग्णालयात धाव घेतली.

येणारा प्रत्येक जण जुलाब, उलट्यांचा त्रास असल्याचं सांगत होता. सकाळपासून सुरू झालेली रुग्णांची गर्दी रात्री उशिरापर्यंत कायम होती. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे डॉक्टर, कर्मचारी वर्गही हैराण झाला होता. परिसरात होणाऱ्या अशुद्ध पाणी पुरवठ्यामुळे हा त्रास होत असल्याचं बोललं जात आहे.

रुग्णांना उपचारासाठी सलाईन लावण्याची वेळ येत होती. परंतु जागेअभावी जमिनीवर, बाकड्यांवर आणि एकाच खाटेवर दोघांना सलाईन लावण्याची वेळ आली. रात्री 10 वाजेपर्यंत 250 रुग्णांवर उपचार करण्यात आल्याचं येथील डॉक्टरांनी सांगितलं.