Electricity Demand Increased : उकाड्यात झालेली वाढ तसेच दिवाळीच्या काळातली रोषणाई या कारणांमुळं राज्यात विजेच्या मागणीत मोठी वाढ (Electricity Demand Increased) झाली आहे. राज्यात 25 हजार मेगावॉटपेक्षा जास्त विजेची मागणी झाली आहे. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 21 ते 22 हजार मेगावॉट दरम्यान मर्यादित असलेली विजेची मागणी आता टप्प्याटप्प्याने वाढत जाऊन 25 हजार मेगावॉट पर्यंत पोहोचली आहे.
ऑक्टोबर महिन्यात ऑक्टोबर हिटमुळे तापमान वाढल्याने शहरांमध्ये विजेची मागणी तर वाढलीच, दुसऱ्या बाजूला ग्रामीण भागात कृषी पंपांच्या विजेची मागणीही टप्प्याटप्प्याने दुप्पट झाली आहे. त्यामुळं ऑक्टोबरच्या शेवटी राज्यात 25 हजार 212 मेगावॉट विजेची मागणी होती. विजेची मागणी आणखी वाढली तर पावर एक्सचेंज मधून वीज खरेदी करण्याची वेल महावितरणवर येऊ शकते. दरम्यान अशा स्थितीत राज्यातील कोराडी, भुसावळ आणि परळी येथील औष्णिक वीज केंद्रात प्रत्येकी एक युनिट बंद असल्याने विजेच्या मागणी आणि पुरवठ्यामध्ये समतोल साधणं कठीण झालं आहे.
उकाडा वाढत असल्याने वीजेच्या मागणीत वाढ
पावसाळ्यात राज्यातील तापमान कमी होत असल्याने विजेची मागणी साधारणपणे 20 ते 22 हजार मेगावॅट दरम्यान असते. पावसाळ्याच्या सुरुवातीला चांगला पाऊस पडल्याने ही मागणी कमी झाली होती. परंतु उकाडा वाढत असल्याने सर्वत्र वातानुकूलित यंत्रे, पंखे, विजेची उपकरणे, कृषिपंपाचा वापर व औद्योगिक क्षेत्रातील विजेची मागणी वाढली आहे. मात्र, हा तुटवडा केंद्राच्या अखत्यारीतून भरुन काढला जात असल्याने ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यास मदत होत असल्याने महावितरणकडून करण्यात आला.