मुंबई: माहीम मतदारसंघात राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचा मार्ग निर्धोक करण्यासाठी महायुतीच्या गोटात जोरदार प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी गुरुवारी रात्री शिवसेनेचे स्थानिक आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर गेले होते. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर महायुतीचे नेते बंडखोरांची समजूत काढण्याच्या कामाला लागले होते. 4 नोव्हेंबर हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यापूर्वी सदा सरवणकर यांची समजूत काढण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत.
राज ठाकरे यांनी लोकसभेला महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यामुळे माहीममध्ये अमित ठाकरे यांच्याविरोधात उमेदवार देऊ नये, असे महायुतीमधील अनेक नेत्यांचे म्हणणे आहे. आशिष शेलार, नितेश राणे, दीपक केसरकर यांनी अमित ठाकरे यांच्या उमेदवारीला पाठिंबा दर्शविला आहे. मात्र, सदा सरवणकर हे आपल्या हक्काचा मतदारसंघ सोडायला तयार नाही. चर्चा करायची वेळ आता निघून गेली, मी कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढणारच, अशी भूमिका सदा सरवणकर यांनी घेतली होती. मात्र, सदा सरवणकर यांच्याशी सतत चर्चा करुन माहीममधून माघार घ्यावी, यासाठी अजूनही जोरदार प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे आता सदा सरवणकर हे खरोखरच माहीम मतदारसंघावरचा दावा सोडणार का, हे पाहावे लागेल. तसे करताना कोणती राजकीय तडजोड होणार, याकडेही सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
एकनाथ शिंदे यांचा राज ठाकरेंना शह?
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आगामी काळात भाजपचा मुख्यमंत्री होतील, असा अंदाज व्यक्त केला होता. त्यांच्या या वक्तव्यामुळे एकनाथ शिंदे नाराज झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळेच एकनाथ शिंदे यांनी आता राज ठाकरे यांच्याविरोधात भूमिका घेतल्याचे सूत्रांकडून सांगितले जाते. माहीममध्ये सदा सरवणकर यांच्या कार्यकर्त्यांचा उत्साह, आनंद मोठा आहे. प्रत्येक पक्षाला कार्यकर्त्यांच्या भावना जपण्याची गरज असते. सदा सरवणकर यांच्या उमेदवारीचा निर्णय मी कार्यकर्त्यांच्या मनावर सोडला आहे, अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी घेतल्याचे समजते. त्यामुळे एकनाथ शिंदे हे माहीमची जागा अमित ठाकरे यांच्यासाठी सोडण्यास फारसे उत्सुक नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
आणखी वाचा
अमित ठाकरेंनी माहीम विधानसभा मतदारसंघच का निवडला?; समजून घ्या, यामागचं 'राज'कीय गणित!
महायुतीकडून सदा सरवणकर यांना मोठी ऑफर, अर्ज माघारी घेणार?; राजकीय वर्तुळात खळबळ