मुंबई : कोल्हापूर आणि सांगलीतील पूरग्रस्तांसाठी राज्यातील विविध भागांमधून मदतीचे हात पुढे आहेत. सरकारसह अनेक सामाजिक संस्था, सामान्य नागरिक आपापल्या परीने मदत करत आहेत. आधी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पाण्यात उतरलेले खासदार छत्रपती संभाजीराजे आता पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी पाच कोटी रुपयांची मदत करणार आहेत. स्वत: संभाजीराजेंनी ट्विटरवर याबाबतची माहिती दिली

"महापूरामध्ये अनेक गावे उद्ध्वस्त झालेली आहेत. या गावांमध्ये मुलभूत सुविधा पुरवणे अत्यावश्यक असल्याने माझ्या निधीतून 5 कोटी रुपये महापुराने प्रभावित क्षेत्रात खर्च करण्याचा संकल्प मी केला आहे. मला हे माहिती आहे, की रयतेच्या सेवेकरिता हे काहीही नाही. ही एक सुरुवात आहे. शिव शाहू विचारांसाठी आणि समाज सेवेसाठी माझं संपूर्ण जीवनच समर्पित आहे," असं ट्वीट छत्रपती संभाजीराजे यांनी केलं आहे.


पश्चिम महाराष्ट्रातील अतिवृष्टीमुळे कोल्हापुरात पंचगंगा आणि सांगलीत कृष्णा नदीने पाणीपातळी ओलांडली, परिणामी दोन्ही जिल्ह्यात पूर आला. परंतु या महाप्रलयात हजारोंचे संसार उद्ध्वस्त झाले. या नागरिकांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वच स्तरातून मदत पुरवली जात आहे. त्यातच राज्यसभेचे खासदार यांनी पूरग्रस्तांसाठी पाच कोटी रुपयांची मदत करणार असल्याचं जाहीर केलं.

महत्त्वाचं म्हणजे महापुरानंतर संभाजीराजेंनी केवळ आर्थिक मदत केली नाही, तर स्वत: पूरग्रस्त भागात जाऊन मदत केली. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी बचावदल पोहोचावं याचा पाठपुरावा केला. तसंच सोशल मीडियाच्या माध्यमातून आपलं कार्यालय 24 तास खुलं ठेवलं. कोणत्याही मदत लागल्यास जाहीर केलेल्या क्रमांकावर फोन करण्याचं आवाहन त्यांनी केलं. आता खासदार निधीतील पाच कोटी रुपयांची रक्कम ते पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी देणार आहेत.