HSC Paper Leak : बारावी गणित पेपरफुटीप्रकरणी ( HSC Paper Leak) धक्कादायक माहिती समोर येत आहे. बारावीचा गणिताचा पेपर अहमदनगरच्या महाविद्यालयातील 119 विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तासभर आधी मिळाल्याची माहिती क्राईम ब्रान्चच्या तपासातून समोर आली आहे. गणिताचा पेपर सोपवण्यात आलेल्या एचएससी बोर्डाच्या सदस्यांची भूमिकाही संशयास्पद असल्याचे गुन्हे शाखेच्या सूत्रांनी सांगितले.


बारावी गणित पेपरफुटीप्रकरणी अहमदनगरच्या मातोश्री भागूबाई भामरे विद्यालयातील मुख्याध्यापकांसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. मुंबई क्राईम ब्रान्चने ही कारवाई  केली आहे. क्राईम ब्रान्चच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. 3 मार्चला बारावी गणिताचा पेपर महाविद्यालयातील विद्यार्थांना एक तास आधीच मिळाला होता. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अहमदनगरच्या महाविद्यालयात 337 विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसले होते. त्यापैकी 119 विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र हे महाविद्यालयातच आले होते. शाळेचा निकाल 100 टक्के लागावा या उद्देशाने शाळेच्या व्यवस्थापनाने पेपर फोडला. परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका आल्यानंतर त्याचे छायाचित्र काढून व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून पाठवून प्रत्येकी 10 हजार रुपये घेतल्याचे समोर आलं आहे. याचा तपास सध्या सुरु आहे.


संस्थाचालकाची भूमिका संशयास्पद


मुंबई गुन्हे शाखेची एक टीम सध्या अहमदनगरमध्ये आहे. शिक्षण मंडळाच्या कार्यालयातील काहींचा सहभाग असल्याचा संशय गुन्हे शाखेला आहे. तपासादरम्यान संस्थाचालकाची भूमिका संशयास्पद असल्याचे काही पुरावे क्राईम ब्रान्चच्या हाती लागले आहेत. संस्थाचालक सध्या बेपत्ता असून शोध सुरु आहे.  


विद्यार्थ्यांची चौकशी करणार 


महाविद्यालयातील ज्या विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र इतर महाविद्यालयात आले अशा विद्यार्थ्यांची देखील चौकशी करण्यात येणार आहे. परंतु सध्या बारावीच्या परीक्षा सुरु आहेत आणि विद्यार्थी अल्पवयीन आहेत. परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांवर ताण येऊ नये यासाठी परीक्षा संपल्यानंतर चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती क्राईम ब्रान्चच्या अधिकाऱ्यांनी दिली. 


शिक्षण मंडळाच्या कार्यालयातील काहींचा सहभाग


या पेपरफुटीत शिक्षण मंडळाच्या कार्यालयातील काहींचा सहभाग असल्याचा संशय क्राईम ब्रान्चला आहे. कारण बोर्डाच्या गाईडलाईननुसार पेपर महाविद्यालयाशी संबधित शिक्षकाकडे म्हणजे रनरकडे दिला जात नाही. मात्र अहमदनगरमध्ये पेपर हा महाविद्यालयाशी संबंधित रनरकडे सोपवण्यात आला. रनर हा कायम दुसऱ्या शाळेतील किंवा महाविद्यालयातील असला पाहिजे. शिवाय या पेपरफुटीचं कनेक्शन राज्यातील इतर ठिकाणी आहे का? इतर शाळेतील विद्यार्थ्यांना हा पेपर मिळाला का? बुलढाण्यातील पेपरफुटीचा त्याचा याच्याशी संबंध आहे का? याची देखील चौकशी सुरु आहे.


बुलढाण्यातील बारावी गणिताच्या पेपरफुटीचा मास्टरमाईंड SIT ने शोधला


दुसरीकडे बुलढाण्यातील बारावी गणिताच्या पेपरफुटी प्रकरणाचा मास्टरमाईंड SIT ने शोधला आहे. लोणार येथील खाजगी शाळेतील शिक्षक असलेला अकील मुनाफ हाच पेपरफुटीचा मुख्य आरोपी असल्याची माहिती एसआयटीच्या सुत्रांनी दिली आहे. अकील मुनाफ याने गणिताचा पेपर सुरु होण्याआधी आपल्या मोबाईल फोनच्या कॅमेरात पेपरचे फोटो काढून इतरांना पाठवले. दरम्यान अकील मुनाफ सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या :


Nashik News : धक्कादायक! दहावीच्या पेपरची तयारी सुरु होती, शिक्षक जमिनीवर कोसळले, विद्यार्थ्यांचा हंबरडा!


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI