HSC Maths Paper Leak : बुलढाण्यात बारावीचा पेपर फुटला आहे. गणिताचा पेपर सुरु झाल्यानंतर अवघ्या अर्धा तासात गणिताचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाला. याप्रकरणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेतही नाराजी व्यक्त केली होती. बोर्डाकडून याबाबत तात्काळ दखल घेत गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बोर्डाकडून कॉपीमुक्त अभियान राबवले जात आहे, मात्र दुसराच पेपर फुटल्यामुळे राज्यभर याची चर्चा होत आहे. 


बुलढाण्यातील सिंदखेडराजामध्ये (Buldhana Sindkhed News)  बारावीचा गणिताचा पेपर परीक्षा (HSC Maths Paper Leak)  सुरु झाल्यानंतर अर्ध्या तासातच पेपर फुटला. गणिताचा पेपर सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. पेपरफुटीच्या मुद्द्यावर विधानसभेतही चर्चा झाली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडून सभागृहात मुद्दा उपस्थित करण्यात आला. 


गणिताचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाला, या संदर्भात सिंदखेडराजा तालुक्यातील साखर खेर्डा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुण्यातही बोर्डाकडून याबाबत गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बुलढाण्यात गट शिक्षणाधिकारी गावडे यांनी गणिताचा पेपर फुटल्याप्रकरणी पोलिसात तक्रार दिली आहे. पेपर कुठल्या केंद्रावर लीक झाता हे अद्याप स्थळ समजले नाही. पण याबाबत पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 


बुलढाणा पेपरफुटी प्रकरणी कडक कारवाई होईल


बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे आज गणिताचा पेपर फुटला याची सखोल चौकशी केली जाईल आणि दोषींवर कडक कारवाई केली जाईल अशी माहिती अमरावती बोर्डाचे सचिव उल्हास नरड यांनी एबीपी माझाला दिली आहे. विद्यार्थी 11 वाजताच वर्गात बसलेले होते, त्यामुळे याची चौकशी झाल्याशिवाय अधिक बोलता येणार नाही. पण जे कोणी यात दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल. यासंदर्भात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस योग्य ते कारवाई करतील, असे उल्हास नरड यांनी सांगितले. 


परभणीत शिक्षकांनी फोडला होता पेपर 
परभणी जिल्ह्यात महालिंगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षकांनीच इंग्रजीचा पेपर फोडून विद्यार्थ्यांसाठी कॉपी तयार करत असल्याचा धक्कादायक प्रकार सोनपेठ पोलिसांनी उघडकीस आणला होता. या प्रकरणी उपकेंद्र संचालक कालिदास कुलकर्णी, इंग्रजी शिक्षक बालाजी बुलबुले, जिजामाता विद्यालयाचा शिक्षक गणेश जयतपाल, शिक्षकरमेश मारोती शिंदे, शिक्षक सिद्धार्थ सोनाळे, शिक्षक भास्कर तिरमले या जणांवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे. 


पेपरफुटीबाबत अजित पवारांचा सवाल, राधाकृष्ण विखे पाटलांचं उत्तर
बारावीच्या पेपरफुटीवर अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडून सभागृहात मुद्दा उपस्थित करण्यात आला होता.  " बुलढाण्यातील सिंदखेडचा राजा या ठिकाणी बारावीचा पेपर फुटला. अभ्यास करणाऱ्यां विद्यार्थ्यांचं मोठ नुकसान झाले आहे. सरकार काय करणार असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला होता. अजित पवारांच्या या प्रश्नाला मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उत्तर दिले.  या प्रकरणी संध्याकाळपर्यंत चौकशी करु अशी प्रतिक्रिया राधाकृष्ण विखे पाटलांनी दिली. 


शिक्षण मंडळाकडून कॉपीमुक्त अभियान, मात्र...
बोर्डाच्या खबरदारीनंतरही पहिल्याच दिवसापासून परीक्षेपूर्वी पेपर व्हायरल होण्याचे प्रकरण समोर येत आहेत. एकीकडे शिक्षण मंडळ कॉपीमुक्त परीक्षा व्हाव्यात यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करत आहे. बैठे पथक, भरारी पथक यासह पोलिसांची पथके परीक्षा केंद्राबाहेर तैनात करण्यात आली आहेत. तर दुसरीकडे मात्र थेट परीक्षा केंद्रावरील पेपर फुटल्याची प्रकरणे समोर येत आहे.  त्यामुळे या प्रकारामुळे शिक्षण विभागाच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.