HSC Exam : बारावीचा आज पेपर फुटला नाही, त्यामुळे पुन्हा गणिताची परीक्षा होणार नाही, असे बोर्डाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. आज बुलढाण्यात सकाकी गणिताचा पेपर सुरु झाल्यानंतर अर्धा तासात व्हायरल झाला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. 


बारावी बोर्डाचा आज गणित विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील दोन पृष्ठे सिंदखेड राजा तालुक्यातील एका परीक्षा केंद्रावरून व्हायरल झाली होती. याबाबतची बातमी आज सर्व वृत्तवाहिन्यावरून प्रसिध्द झाली. तथापि, या विषयाची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यापर्यंत पोहोचल्याचे राज्यात कोठेही आढळून आलेले नाही, यामुळे इयत्ता 12 वी च्या गणित विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नसल्याचे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले आहे.


या प्रश्नपत्रिकेतील दोन पृष्ठे ही सकाळी साडेदहानंतर प्रसिद्ध झाली आहेत. मंडळ सूचनेनुसार सकाळ सत्रात साडेदहा वाजेपर्यंत व दुपार सत्रात अडीच वाजेपर्यंत परीक्षा दालनात परीक्षार्थींनी उपस्थित राहणे बंधनकारक केलेले आहे. त्या वेळेनंतर कोणत्याही विद्यार्थ्यास परीक्षा दालनात प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे गणित विषयाचा पेपर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्याचे राज्यात कोठेही आढळून आलेले नाही. असे मंडळाच्या वतीने कळविण्यात आले आहे.


बंधित घटनेबाबत सिंदखेड राजा पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिस पुढील तपास करीत आहेत. त्यामुळे गणित या विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नाही. याची विद्यार्थी, शिक्षक, पालक व सर्व संबंधित घटकांनी नोंद घ्यावी, असे श्रीमती ओक यांनी स्पष्ट केले आहे.


 बारावीचा गणिताचा पेपर फुटल्या प्रकरणी सिंदखेड राजा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल 
 बुलढाणा जिल्ह्यात आज बारावीचा गणिताचा पेपर फुटल्याने सर्वत्र एकच खळबळ माजली आहे. गटशिक्षणाधिकारी सिंदखेडराजा यांनी दिलेल्या तक्रारीवरून सिंदखेडराजा पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र विद्यापीठ कायद्याच्या विविध कलमानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेगाव येथून एका शाळेतून हा पेपर फुटला असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली असून तक्रारीत नमूद प्रमाणे राजेगाव हा भाग साखरखेडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत असल्याने सदर गुन्हा साखरखेडा पोलिसांकडे वर्ग करणार असल्याची माहिती सिंदखेड राजा पोलीस निरीक्षक केशव वाघ यांनी दिली आहे. बारावीचा पेपर राजेगाव येथील एका परीक्षा केंद्रावरून फुटला असल्याची माहिती तक्रारीत नमूद करण्यात आली आहे.. त्यामुळे आता पोलीस कारवाईत काय तथ्य समोर येतात ते पाहावं लागणार आहे..