पुणे : बारावीची परीक्षा नुकतीच सुरु झाली. बोर्डाच्या परीक्षेनंतर मुलांच्या भवितव्यासाठी महत्त्वाच्या असतात त्या विविध प्रवेश परीक्षा. विद्यार्थ्यांना चांगली तयारी करता यावी, यासाठी बोर्डानेच पुढाकार घेतला आहे. बारावीनंतर सीईटी, जेईई आणि नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने एक खास वेबसाईट सुरु केली आहे.


मंडळाच्या कार्यकक्षेतील विद्यार्थ्यांना MHTCET, JEE, NEET परीक्षांच्या स्वरुपानुसार प्रश्नांच्या सरावासाठी अकरावी बारावीच्या भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, संख्याशास्त्र (PCBM) या विषयांच्या अभ्यासक्रमावर आधारित बहुपर्यायी (MCQ) प्रश्नांचे ऑनलाईन प्रिपरेशन पोर्टल mcqpractice.mh-hsc.ac.in या वेबसाईटवर मंडळामार्फत सुरु करण्यात आले आहेत.

या पोर्टलसाठी वेबसाइटवर क्लिक केल्यानंतर सुरुवातीला पोर्टलच्या सुलभ वापरासाठी सविस्तर सूचना दिल्या आहेत.

1. या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना त्यांची माहिती भरुन संकेतस्थळासाठी पासवर्ड तयार करावा लागेल
2. विद्यार्थ्यांचा मोबाईल क्रमांक व पासवर्ड वापरुन या संकेतस्थळाचा वापर करता येईल
3. सुरुवातीच्या कालावधीतील प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक विषयाचे 25 प्रश्न एका दिवशी सोडवता येतील
4. कालांतराने ही प्रश्नसंख्या वाढवली जाईल
5. विद्यार्थ्याने सोडवलेला प्रश्न चूक आहे की बरोबर, हे लगेचच समजेल
6. दिवसागणिक आपली प्रगती विद्यार्थ्यांना पाहता येईल

या पोर्टलवर असलेले प्रश्न हे त्या-त्या विषयांतील तज्ज्ञांनी आणि शिक्षकांनी काढलेले आहेत. हे प्रश्न MHTCET, JEE, NEET या परीक्षांच्या फक्त सरावासाठी आहेत. परीक्षेमध्ये यातूनच प्रश्न येतील असं नाही.