Maharashtra Politics: राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी देवेंद्र फडणवीसांसोबत (Devendra Fadnavis) पुन्हा युतीचं सरकार आणल्यानंतर एकनाथ शिंदे (शिवसेना) आणि सध्या विरोधकांच्या भूमिकेत महाविकास आघाडी ज्यात खासकरून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या (Uddhav Thackeray) अनेक सभा महाराष्ट्रात होऊ लागल्या आहेत. या सभांसाठी कोट्यावधींचा खर्च करण्यात येतोय. मात्र त्यासाठी पैसे आले कुठुन? याबाबत महाराष्ट्रातील सर्व पक्षांकडून निवडणुक आयोगानं (Election Commission) हिशोब मागावा अशी मागणी करत तशी लेखी तक्रार इंडिया अगेन्स्ट करपशनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी राज्य निवडणूक आगोगाला केली आहे.
या पत्रात त्यांनी आरोप केला आहे की, महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांना सध्या निवडणुक आयोगानं मोकळं सोडलेलं आहे. मुळात या सर्व पक्षांवर राज्य निवडणुक आयोगाचं नियंत्रण असायला हवं होत. मात्र, तसं होताना दिसत नाही, अशी खंत त्यांनी बोलून दाखवली आहे. एकीकडे अवकाळीचं संकट आहे, उभी पिकं आडवी झालीत. नुकसानभरपाईचे पंचनामे रखडलेत, काही ठिकाणी पंचनामे होऊनही अद्याप शासकीय मदत मिळालेली नाही, महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या करत असताना अश्या मोठमोठ्या जाहीर सभांना मात्र ऊत आला आहे. सध्या सर्वच राजकीय पक्षांतील नेतेमंडळी दररोज एकमेकांवर आरोप प्रतिआरोप करुन आपआपली राजकीय पोळी भाजून घेत आहेत. त्यांना राज्यातील सर्वसामान्यांच्या प्रश्नांचं काही देणघेणंच उरलेलं नाही. बेरोजगारी व महागाई बाबतीत कुणीही बोलत नाही. फक्त दुसऱ्याचा पक्ष फोडून आपलाच पक्ष कसा वाढेल? आपल्याच पक्षाला कशी प्रसिद्धी मिळेल? याचाच खटाटोप सर्वांचा सुरू असल्याचे पाटील यांनी म्हटले.
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, संजय राऊत, एनसीपीचे अजित पवार, काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ही नेते मंडळी या आरोप प्रत्यारोपांत आघाडीवर असल्याचा आरोप या तक्रारीतून करण्यात आला आहे. ही सारी मंडळी आपली राजकीय उंची वाढवण्याचा प्रयत्न करताना जनतेला, सर्व सामान्य माणसाच्या अडचणींना आणि मुळात अडचणीत असणाऱ्या शेतकरी राजालाही विसरलेत. त्यामुळे या सभांचा सिलसिला थांबवून निवडणुक आयोगानं या सर्व राजकीय पक्षांकडून हिशोब मागत या साखळी सभांसाठी पैसे आले कुठुन? व ते गेले कुठे? याचा जाब विचारत याबाबतीत सखोल चौकशी करण्याची मागणी केली असल्याचे हेमंट पाटील यांनी म्हटले.