परभणी : परभणीत 11  जून रोजी मध्यरात्री मुसळधार पाऊस झाला होता. मात्र या पावसाच्या नोंदी तीन ठिकाणी वेगवगेळ्या नोंदवण्यात आल्या होत्या. याबाबत नेमका पाऊस किती झाला? यावरुन प्रश्नचिन्ह उभं राहिलं होतं. विशेष म्हणजे पावसाच्या आकड्यात तफावत आढळल्यानंतर सत्यता जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली 5 अधिकाऱ्यांची एक समिती नेमली होती. त्या उपजिल्हाधिकारी बिबे यांच्या समितीने अहवाल तयार करून जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांना दिलाय. या समितीच्या निष्कर्षानुसार परभणीत त्यादिवशी घेतलेल्या पावसाच्या तिन्ही नोंदी खऱ्या आहेत.

11 जूनचा पाऊस हा मान्सून पूर्व पाऊस होता. मान्सूनपूर्व पाऊस असल्याने पावसाची तीव्रता कुठे कमी कुठे जास्त होती.  आयएमडीची वेधशाळा जिथे होती तिथं ढग मोठ्या प्रमाणावर होते तिथं पाऊस जास्त झाला. कृषी विद्यापीठाच्या वेधशाळा परिसरात पाऊस कमी झाला. जिल्हा प्रशासनाचे पर्जन्यमापक हे चुकीच्या पद्धतीने बसवण्यात आले होते. जमिनीऐवजी ते तहसील कार्यालयाच्या छतावर असल्याने तिथली नोंद कमी आली, असं समितीनं म्हटलं आहे.


या तिन्ही नोंदी प्रशासकीय कामकाजात ग्राह्य धरणार नाहीत. महावेध प्रणालीच्या स्कायमेटने दिलेली 165 मिमी पावसाची नोंद ग्राह्य धरली जाणार आहे. जिल्हाभरातील सर्व महसूल मंडळामधील पर्जन्यमापक बदलण्याचा निर्णय  घेतला आहे.


परभणीत 11 जूनला एका रात्रीतील 4 तासात तब्बल 186.2 मिमी पाऊस पडल्याचा दावा भारतीय हवामान खात्याने केला होता. ज्याची नोंद देखील आहे. मात्र याच दिवशी याच वेळी 85 मिमी पावसाची नोंद महसूल विभागाकडे झाली होती. याहून अधिक म्हणजे कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागाने तर 58.8 मिमीची नोंद केली होती. त्यामुळे नेमके खरे आकडे कुणाचे? हा प्रश्न निर्माण झाला होता. यामुळं खरंच हा पाऊस एवढा पडलाय का? याचा शोध घेण्यासाठी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी समिती नेमली होती.




परभणी शहरातील सार्वजनिक बांधकाम कार्यालय परिसरात भारतीय हवामान खात्याची वेधशाळा आहे. तिथं 11 जूनच्या रात्री 1 ते 5 या 4  तासात 186.2 मिमी एवढा पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली होती. इथूनच एक ते दीड किलोमीटर वर जिल्हाधिकारी कार्यालय आहे. जिथे महसूल विभागाचे पर्जन्यमापक आहे तिथं 85 मिमी आणि जिल्हाधिकारी कार्यालयापासून तीन किलोमीटरवर कृषी विद्यापीठाची वेधशाळा आहे तिथे 58.8 एवढी पावसाची नोंद करण्यात आली होती.