मुंबई : काही दिवसांपूर्वी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून अनेक खळबळजनक खुलासे केले होते. तसेच परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवरही अनेक गंभीर आरोप केले होते. त्यावरुन सध्या विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकेची तोफ डागली आहे. विरोधी पक्ष असलेल्या भाजपनं गृहमंत्री अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच आज परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रातील आरोपांची चौकशी व्हावी, या मागणीसाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. यासर्व घडामोडींवर बोलताना राज्याचे महसूल मंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांशी संवाद साधला. एक पत्र अन् लगेच त्या मंत्र्याची चौकशी असं कसं होऊ शकतं?, असा सवाल बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केला आहे. 


काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात बोलताना म्हणाले की, "चौकशच्याबाबतीचा निर्णय झालेल नाही, तर तसा विषय येतो कुठं? आम्ही या विषयात इतकं पुढं गेलोच नाही, एक पत्र आणि लगेच त्या मंत्र्याची चौकशी असं कसं होऊ शकतं? भाजप शेवटी विरोधी पक्षात आहे, सत्ता नसल्यामुळे ते अस्वस्थ आहेत. त्यांचा सतत प्रयत्न सुरु असतो, जी गोष्ट घडली त्यावरून वातावरण निर्माण करण्याकरता त्यांना ती संधी वाटत आहे. फक्त सत्तेसाठी चाललेला त्यांचा प्रयत्न आहे. काही प्रश्न असे आहेत की, ज्याचं उत्तर मी देण्याची आवश्यकता नाही, त्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेतलेले आहेत, त्यामुळे त्यांनीच माहिती देणं योग्य आहे."


परमबीर सिंह यांचं पत्र आताच का? यासह 'या' मुद्यांमुळं पत्रावर प्रश्नचिन्ह


भाजपकडून वांरवार करण्यात येणाऱ्या आरोपांसंदर्भात बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, "राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे असं म्हणण्याचं काही कारण नाही, कारण याआधी युती सरकारचा कालखंड होता, त्या काळात देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळी, अनेक प्रश्न निर्माण होत होते. आम्ही तर सांगितलेलं आहे की, परमबीर सिंग यांचं पत्र देखील कुठंतरी दबावातून त्यांनी असं केलेलं दिसत आहे. त्यामुळे त्यांच्या प्रतिक्रियेवर आम्ही बोललं पाहिजे असं नाही." तसेच ते पुढे बोलताना म्हणाले की, "आम्ही तिन्ही पक्षांचे नेते अजून एकत्र बसलेलो नाही, आमची एकत्र चर्चा होणार आहे. पत्र पाठवणं, त्यानंतर पत्राच्या आधारावर राजीनाम्याची मागणी होणं, यामार्फत कुठंतरी षडयंत्र रचलं जात आहे, असं आम्हाला वाटतंय."


महत्त्वाच्या इतर बातम्या :