मंत्रिमंडळाचा विस्तार जवळपास गेल्या वर्षभरापासून रखडला होता. अखेर या विस्ताराला मुहूर्त मिळणार आहे. दिल्ली दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत जवळपास दीड तास बंद दाराआड चर्चा केली.
चर्चेत चार नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. एसआरए घोटाळ्यामुळे बदनाम झालेले गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांना घरी बसवून राज्यातील सरकारची प्रतिमा धुवून काढण्याचा प्रयत्न असणार आहे.
प्रकाश मेहता यांनी एसआरए घोटाळ्याबाबत मुख्यमंत्र्यांना अवगत असल्याचा शेरा दिला होता, मात्र विधानसभेतच मुख्यमंत्र्यांनी हा दावा फेटाळल्यामुळे लोकायुक्तांमार्फत या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. त्यामुळे मेहतांना बाहेरचा रस्ता दाखवला जाण्याची चिन्हं आहेत.
प्रकाश मेहतांवर एसआरए घोटाळ्याचा आरोप
मुंबईतील ताडदेवमधल्या एम. पी. मिल कम्पाऊंड येथील एसआरए प्रकल्पात एफएसआय घोटाळा केल्याचा आरोप गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्यावर आहे. विकासकाला फायदा देण्यासाठी प्रकाश मेहता यांनी नियम बाजूला ठेवून एफएसआय अन्यत्र वापरास मंजुरी दिल्याचा आरोप होत आहे.
3K च्या नियमात एका विकासकाला फायदा देण्यासाठी धोरण ठरवता येत नसल्याचं कारण सांगत गृहनिर्माण विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांनी प्रस्तावाला विरोध केला होता. तसंच पीएपी (प्रकल्पबाधितांची घरं) संदर्भातही प्रस्तावावरही त्यांनी प्रतिकूल शेरा मारला होता.
पण मेहता यांनी ही फाईल मंजूर करताना मुख्यमंत्र्यांना अवगत केल्याचा शेरा मारला होता.
संबंधित बातम्या