शिर्डी : वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आता शिर्डीतील व्यवसाय रात्री 11 ते सकाळी 5 पर्यंत बंद ठेवले जाणार आहे. शिर्डी ग्रामस्थ आणि पोलीस यांच्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. काल रात्रीपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे.
साई मंदिर रोज सकाळी 4.30 वाजता काकड आरतीसाठी उघडले जाते. तर रात्री 10.30 वाजता शेजारती केल्यावर मंदिर बंद होते.
शिर्डी हे आंतरराष्ट्रीय देवस्थान असून, गेल्या काही महिन्यात शिर्डी व परिसरात गुन्हेगारीच्या घटनेत वाढ होत आहेत. गोळीबारासारख्या घटनाही समोर आल्या आहेत. शिर्डीत गेल्या काही दिवसांपासून चोऱ्या, पाकीटमारीसारख्या घटनांमध्ये सतत वाढ होत आहे. यातून टोळ्या निर्माण झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर शिर्डी ग्रामस्थ आणि पोलीस यांनी संयुक्त बैठक घेऊन, यात रात्री उशिरापर्यंत सुरु राहणाऱ्या हॉटेल, हातगाड्या या रात्री 11 नंतर सकाळी 5 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. या विषयी शिर्डीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी सागर पाटील यांनी अधिक माहिती दिली.
या निर्णायाला ग्रामस्थांनी पाठिंबा दिला असून, याशिवाय शहरातील अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्याची विनंती केली आहे.
गेल्या दोन महिन्यात शिर्डी व परिसरात अनेक घटना घडल्या असून, काहींचा तपास लागला आहे, तर अनेक घटनांचा आजही तपास सुरु आहे.
26 डिसेंबर रोजी चोरीच्या मोबाईलच्या वादातून दोन गटात झालेल्या मारहाणीनंतर केलेल्या गोळीबारात किसन बागुल या 25 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला होता, तर 22 जानेवारीला शिर्डीतील साई निवास मेघा धर्म शाळेत सुरु असलेल्या विवाह सोहळ्यातून आठ लाखांचे दागिने लंपास झाले. भरदिवसा घडलेल्या घटनेत लहान मुलांचा वापर करून चोरी करणाऱ्या परप्रांतिय महिलांना अटक करण्यात आली. 1 मार्चला शिर्डीपासून जवळ असलेल्या नगर मनमाड महामार्गावर अस्तगाव शिवारात पूर्व वैमनस्यतून मच्छिन्द्र जगताप यांच्यावर दुपारच्या सुमारास दुचाकी वरून येत गोळीबार केला होता.
एकूणच या घटना व्यतिरिक्त पाकीटमारी, मोबाईल चोरी सारख्या अनेक घटना सतत घडतात. काही घटनांची नोंद होते, तर अनेक साईभक्त दूरवरून येत असल्यानं तक्रारही करत नाहीत.