ठाणे : "इतर ठिकाणी कोणाचीही हवा असो, पण ठाणेकर अविचलपणे भगव्याच्या पाठीशी उभा राहिलेला आहे. ठाण्यात माझा पहिला कार्यक्रम होईल तेव्हा मी ठाणेकरांसमोर नतमस्तक होणार आहे," अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाण्यातील जनतेचे आभार मानले. ते आज ठाण्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते.
शिवसेनेच्या मीनाक्षी शिंदे यांची ठाण्याच्या महापौरपदी निवड झाली. तर उपमहापौरपद शिवसेनेच्या रमाकांत मढवी यांना मिळालं. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी ठाणेकर आणि शिवसैनिकांचे आभार मानले. यावेळी त्यांच्यासह पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा आदित्य ठाकरे उपस्थित होते.
ठाणेकरांसमोर नतमस्तक होणार
उद्धव ठाकरे म्हणाले की, "ठाणेकर अटीतटीच्या लढतीत प्रत्येक वेळी शिवसेनेच्या मागे राहिले आहेत. इतर ठिकाणी कोणाचीही हवा असो, पण ठाणेकर अविचलपणे भगव्याच्या पाठीशी उभा राहिलेला आहे. ठाण्यात माझा पहिला कार्यक्रम होईल तेव्हा मी ठाणेकरांसमोर नतमस्तक होणार आहे."
शिवसैनिकांना मानाचा मुजरा
"ठाणेकरांना धन्यवाद देतोच, पण शिवसैनिकांनाही मानाचा मुजरा करतो. स्वत:ची सुख-दु:ख बाजूला ठेवून ते अविरतपणे काम करतात. हा विजय ठाणेकर आणि शिवसैनिकांच्या चरणी अर्पण करतो," अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी कृतज्ञता व्यक्त केली.
विरोधी पक्षांचेही आभार
"त्याचबरोबर ठाण्यातील विरोधी पक्षांचेही आभार मानतो. त्यांनी वेगळं असं वातावरण केलं. त्यांनी जनतेचा कौल स्वीकारला आणि उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे महापौर आणि उपमहापौरांची निवड बिनविरोध झाली," असं उद्धव ठाकरे म्हणाले.
दरम्यान, वरिष्ठांच्या आदेशानूसार भाजपने महापौरपद आणि उपमहापौरपदावरील उमेदवारी मागे घेतल्याची माहिती ठाणे भाजपाध्यक्ष संदीप लेले यांनी दिली. त्यामुळे शिवसेनेसाठी आधीच सोपी असणारी महापौरपदाची लढत औपचारिक झाली होती.
विश्वासाला तडा जाऊ देणार नाही
"निवडणुकीआधी दिलेली वचनं पूर्ण करणार आहे. नव्या उमेदीने कामाला सुरुवात करु. प्रेम आणि आशीर्वाद कायम असेच राहू द्या. या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही. हे अत्यंत नम्रतेने ठाणेकरांना सांगत आहे," असं आश्वासन उद्धव ठाकरेंनी दिलं.
मुंबईच्या विजयावर नंतर बोलणार
"मुंबई जिंकली आहेच. पण त्यावरील राजकारणावर नंतर बोले," असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेत घडलेल्या घडामोडींवर बोलण्यास नकार दिला.