बोरिंगमधून येतंय गरम पाणी, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर | 16 Nov 2018 11:06 PM (IST)
जमिनीतून अचानक गरम पाणी येत असल्यामुळे गावात सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसापासून बोरिंगमधून गरम पाणी येत असल्याबाबत माहिती सोशल मीडियावर फोटोसह व्हायरल होत होती.
पालघर : पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील बिलोशी (चोरघे पाडा) येथील शेतकरी काळूराम चोरघे यांच्या मालकीच्या बोरिंगमधून गरम पाणी येत आहे. जमिनीतून अचानक गरम पाणी येत असल्यामुळे गावात सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसापासून बोरिंगमधून गरम पाणी येत असल्याबाबत माहिती सोशल मीडियावर फोटोसह व्हायरल होत होती. वाडा तालुक्यातील बिलोशी (चोरघे पाडा) येथील शेतकरी काळूराम चोरघे यांच्या बोरिंगमधून वीस दिवसापासून काही प्रमाणात गरम पाणी येत असल्याचे त्यांना जाणवत होते. या पाण्याची गरम होण्याचे प्रमाण वाढत चालल्याने गावामध्ये भीतीचे सावट आहे. भूगर्भ तज्ञांकडून याची शहानिशा करण्यात यावी, अशी मागणी चोरघे कुटुंब आणि ग्रामस्थांकडून केली जात आहे. सध्या जिओलॉजिस्ट आणि प्रशासनाच्या टीमने प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन पाण्याचे नमूने घेतले असून ते तपासल्यानंतर खरे कारण कळू शकणार आहे. भूगर्भातील हालचालींमुळे कदाचित वज्रेश्वरी येथील गरम पाण्याचा मार्ग बदलत असल्याची चर्चा देखील ग्रामस्थांमध्ये केली जात आहे. या भागात सातीवली, वज्रेश्वरी येथे गरम पाण्याचे झरे आहेत. हा तसाच प्रकार असावा किंवा भूगर्भात फॉस्फरसचे प्रमाण असल्यामुळे काही प्रमाणात गरम पाणी येत असल्याची संभावना असते म्हणून नागरिकांनी घाबरू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.