धुळे : धुळे शहरातील जेबी रोड वर आज सायंकाळी झालेल्या धुळे महानगर पालिका निवडणूक प्रचारार्थ विजय संकल्प मेळाव्यात प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे, रोहयो, पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत देवा सोनार या गुंडांचा प्रवेश झाला.

प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये देवा सोनारने पहिल्याच क्रमांकावर प्रवेश केला. मार्च 2013 मध्ये होळीच्या दिवशी पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्यावर जुने धुळे भागात देवा सोनार, चंद्रकांत सोनार या पितापुत्रांसह एकूण 20 ते 25 जणांनी हल्ला केला होता. या घटनेत एपीआय धनंजय पाटील हे गंभीर जखमी झाले होते, या प्रकरणी गुन्हा देखील झाला आहे. सध्या हे प्रकरण न्याय प्रविष्ठ आहे.

भाजपच्या याच विजय संकल्प मेळाव्यात भरसभेत गदारोळ झाला. यावेळी भाजप आमदार अनिल गोटे यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी करत गोंधळ केला आणि खुर्च्या फेकल्या. यावेळी रावसाहेब दानवे यांच्यासह मंत्री गिरीश महाजन, पर्यटन व रोहयो मंत्री जयकुमार रावल, संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे हे व्यासपीठावर उपस्थित होते. भाजप आमदार अनिल गोटे यांना धक्काबुक्की झाल्याचा दावा त्यांच्या समर्थकांनी केला आहे.