धुळे: धुळे महानगर पालिकेची निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी तसेच आगामी लोकसभा, विधानसभा निवडणूक लक्षात घेता शहरात कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी शहराच्या विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एकूण 32 अट्टल गुन्हेगारांना धुळे जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे.


मात्र या हद्दपार करण्यात आलेल्या 32 अट्टल गुन्हेगारांमध्ये पोलीस अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या देवा सोनारला वगळल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. देवा सोनारने काही दिवसांपूर्वीच भाजप प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, रोहयो, पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश केला आहे. त्यामुळे त्याच्यावर कारवाई झाली नसल्याची चर्चा शहरात आहे.

ज्या 32 गुंडांना धुळे जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. त्यात देवा सोनारचे नाव का नाही? असा प्रश्न उपस्थित केल्यावर पोलीस अधीक्षकांनी तांत्रिक बाबी पुढे करत उत्तर देण्याचे टाळले.

धुळे शहरातील जेबी रोड वर आज सायंकाळी झालेल्या धुळे महानगर पालिका निवडणूक प्रचारार्थ विजय संकल्प मेळाव्यात प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे, रोहयो, पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत देवा सोनार या गुंडांचा प्रवेश झाला. प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये देवा सोनारने पहिल्याच क्रमांकावर प्रवेश केला. मार्च 2013 मध्ये होळीच्या दिवशी पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्यावर जुने धुळे भागात देवा सोनार, चंद्रकांत सोनार या पितापुत्रांसह एकूण 20 ते 25 जणांनी हल्ला केला होता. या घटनेत एपीआय धनंजय पाटील हे गंभीर जखमी झाले होते, या प्रकरणी गुन्हा देखील झाला आहे. सध्या हे प्रकरण न्याय प्रविष्ठ आहे.