मुंबई : अवकाळी पाऊस, वादळ आणि अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या पीकहानीचा आढावा घेण्यासाठी राज्यात लवकरच केंद्रीय पथक पाठविणार असल्याचे आश्वासन केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना दिले असल्याची माहिती आहे. राज्यपालांनी गुरुवारी संध्याकाळी अमित शाह यांना फोन करून राज्यात अलीकडेच अतिवृष्टीमुळे झालेल्या पीकहानीबद्दल अवगत केले, त्यावेळी शाह यांनी राज्यपालांना लवकरच केंद्रीय पथक पाठविणार असल्याचे आश्वासन दिले.
राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, शिवसेनेची राज्यपालांकडे मागणी
राज्यभरात परतीच्या पावसाने थैमान घातले असून शेतकरी मोठ्या विवंचनेत सापडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीनं मदत मिळावी म्हणून शिवसेनेनं प्रयत्न सुरु केले आहे. त्यासाठी आदित्य ठाकरे याच्या नेतृत्वाखाली अपक्षांसह शिवसेनेच्या सर्व 63 आमदारांनी राजभवन येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना तातडीनं नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. यांसदर्भात राज्यपालांना निवेदनही देण्यात आलं.
दरम्यान, शिवसेनेने नेता निवडीनंतर लगेचच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतल्याने राज्यात अनेक चर्चांना उधाण आलं आहे. शिवसेना भाजपवर दडपण टाकण्याचा प्रयत्न असल्याचं बोललं जातं आहे. सरकार स्थापनेबाबत उद्धव ठाकरे जे बोलतील तो शेवटचा शब्द असेल असं मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. तसेच अतिवृष्टीमुळे फटका बसलेल्या शेतकऱ्यांना तत्काळ मदत मिळावी या मागणीसाठी आम्ही राज्यापालांची भेट घेतली. नोव्हेंबरमध्ये झालेल्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आणि मच्छिमारांना मदत मिळावी अशी मागणी केल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले. राज्यपालांनी आम्हाला राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याचे आदेश देण्याबाबत आश्वासन दिले असल्याचंही म्हणाले.
शरद पवार 6 नोव्हेंबरला परभणी, हिंगोलीच्या दौऱ्यावर
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार येत्या बुधवारी 6 नोव्हेंबरला मराठवाड्याचा पाहणी दौरा करणार आहेत. यावेळी परतीच्या पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची ते पाहणी करणार आहेत. शरद पवारांसोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे देखील असणार आहेत. यावर्षी परतीच्या पावसामुळे मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागात शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. राज्यात ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या दौर्यात शरद पवार परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करणार आहेत. सर्वप्रथम परभणीतील सेलू तालुक्यातील काही भागांची त्यानंतर हिंगोली जिल्ह्यातील वसमत भागात नुकसानीची पाहणी ते करणार आहेत.
परतीच्या पावसाने थैमान घातलं
परतीच्या पावसाने थैमान घातलं असताना राज्यात 7 नोव्हेंबरपर्यंत पाऊस राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तसेच पुढचे 48 तास पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. हवामान विभागाच्या अंदाजाने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. दरम्यान मराठवाडा, विदर्भात आधी दुष्काळ, पश्चिम महाराष्ट्रात महापुरानं शेतकऱ्याना आधीचं मोठ्या प्रमाणात नुकसानीला सामोरे जावं लागलं आहे. अशातचं परतीच्या पावसाचा फटका राज्यात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना बसतो आहे. मराठवाड्यात पावसाने खरीपाची सर्व पिकं जमीनदोस्त झाली आहेत.
विदर्भातही सोयाबीन, कापुस, मका, ज्वारी, उडीद, मुग, यासह इतर पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झालं आहे. पश्चिम महाराष्ट्रातल्या सांगली जिल्ह्यातही द्राक्षबागांचं मोठं नुकसान झालंय. पीकं वाचवण्यासाठी शेतकरी पिकांवर औषध फवारणी करतायेत पण चिखलात ट्रॅक्टर रुतल्यानं मोठ्या संकटांना सामोरं जावं लागतंय.उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसानं सर्वाधिक नुकसान केलं आहे. धुळ्यात निराश शेतकऱ्याने बाजरी कणसासह पेटवून दिलीय तर नंदुरबारच्या नवापूर तालुक्यात चक्रीवादळामुळे घरे आणि शाळेच्या इमारतीचे पत्रे उडून पडझड झाली आहे. कोकणातही भातशेतीला मोठा फटका बसला आहे. कोकणातील 70 टक्के व्यवसाय हा शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे पावसामुळे कोकणातील शेतकरी चांगलाच हवालदील झाला आहे.
Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ओला दुष्काळ पाहणीसाठी केंद्रीय पथक पाठवणार, गृहमंत्र्यांचे राज्यपालांना आश्वासन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
31 Oct 2019 11:41 PM (IST)
परतीच्या पावसाने थैमान घातलं असताना राज्यात 7 नोव्हेंबरपर्यंत पाऊस राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तसेच पुढचे 48 तास पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -