Home Minister Amit Shah Maharashtra Visit : केंद्रात सहकार खातं निर्माण झाल्यानंतर महाराष्ट्रातल्या पहिल्या-वहिल्या सहकार परिषदेतून केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी सहकार चळवळीला सहकार्य न करणाऱ्यांना गर्भित इशारा दिला आहे. डबघाईस आलेल्या जिल्हा बँका मोडकळीस आलेल्या कारखान्यांना नवसंजीवनी देणार असल्याचं सांगतच भ्रष्टाचाराची पाळंमुळं शोधून काढणार असल्याचेही अमित शहा यांनी सांगितलं. अमित शाह महाराष्ट्राच्या दोन दिवसाच्या दौऱ्यावर आहेत. शनिवारी प्रवरानगर येथे राज्यातील पहिली सहकार परिषद पार पडली. यामध्ये अमित शाह बोलत होते. यावेळी अमित शाह यांनी राज्यातील सहकार क्षेत्राला गर्भित इशारा दिला आहे. तसेच यापुढे खासगी साखर कारखाना होणार नसल्याचेही त्यांनी सांगितलं. अमित शाह यांनी यावेळी राज्य सरकारवर निशाणाही साधला, कारखान्याला हमी देताना राजकारण करु नका, असा इशारा यावेळी अमित शाह यांनी दिला. त्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणा ईडी आणि इतर यंत्रणानंतर आता सहकाराची पीडा महाराष्ट्रातील नेत्यांच्या मागे लागण्याची शक्यता आहे.
अमित शाह यांनी आपल्या भाषणातून सहकारातील भ्रष्टाचार करणाऱ्यांना गर्भित इशारा दिला आहे. महाराष्ट्रात सहकार चळवळीतून उभा राहिलेला जिल्हा बँका अनेक सहकारी साखर कारखाने डबघाईला आले. सहकारी साखर कारखाने खाजगी करून काही नेत्यांनी खरेदी केले. त्यामुळे सहकार खातं सहकारातून समृद्धीकडे जाण्याऐवजी मोडकळीस आले. पूर्वी केंद्रात सहकार खातं नव्हतं. सहकार क्षेत्र हे ठराविक राज्यापुरते आणि ठराविक क्षेत्रापुरते मर्यादित असताना केंद्र पातळीवरील सहकार खाते कोणत्या दृष्टीने विचार करत आहे हे स्पष्ट होतय.
'मै यहाँ तोडने नहीं जोडने आया हूँ'
सध्या जिल्हा बँक संकाटात अडकल्या आहेत. कारण या बँकांमध्ये हजारो कोटींचे घोटाळे झाले आहेत. संकटात असलेल्या सर्व बँकांना संकटातून बाहेर काढणार असल्याचे अमित शाह यांनी आजच्या भाषणात सांगितलं. महाराष्ट्रातील जे साखर कारखाने संकटात आहेत, त्यांना पुन्हा उभा करण्याचे काम आम्ही करू. पुन्हा कोणताही सहकारी कारखाना खासगी होणार नाही याची दक्षता घेऊ असेही शाह यावेळी म्हणाले. मी सहकारमंत्री झाल्यावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. महाराष्ट्रात काय होणार? सहकारत काय होणार? पण 'मै यहाँ तोडने नहीं जोडने आया हू' असेही ते म्हणाले.
राज्य सरकारला फटकारलं-
राज्य सरकार फक्त काहीच कारखान्यांचे प्रश्न सोडवण्याचे काम करते. विरोधी पक्षातील नेत्यांच्या कारखान्यांना राज्य सरकार सहकार्य करत नाही. काही जणांना यासाठी दिल्लीला यावे लागलते असे शाह म्हणाले. राज्य सरकारने सहकारी क्षेत्रात राजकारण न करता संकटात सापडलेल्या कारखान्यांना मदत करावी असे ते म्हणाले.
समित्यांच्या भानगडीत पडणार नाही -
आम्ही बँक क्षेत्राला वाचवण्यासाठी पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. आम्ही कोणताही कमिटी अथवा समिती नेमणार नाही. आजवर भरपूर समित्या नेमल्या गेल्या आणि त्यांचे अहवाल धूळखात पडून राहिले. पण त्यावर काहीच झालं नाही. त्यामुळे सहकार चळवळ वाचवण्यासाठी आम्ही कोणत्याही समित्या स्थापन करत बसणार नाही, असे अमित शाह म्हणाले. तसेच सहकार क्षेत्राला पूर्ण मदत करण्याचे आश्वासनही शाह यांनी यावेळी दिले.
संकटातील सर्व बँकांना संकटातून बाहेर काढणार -
सहकारामुळे सबका साथ सबका विकास यशस्वी होणार आहे. सहकारी क्षेत्र पुढे घेऊन जाण्यासाठी जी काही मदत लागेल ती पूर्ण मदत मोदी सरकार करणार असल्याचे शाह म्हणाले. पद्मश्री विठ्ठराव विखे पाटील यांच्या कार्याचा देखील अमित शाह यांनी गौरव केला. त्यांनी उभ केलेली सहकारी चळवळ 100 वर्ष पुढे घेऊन जाण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. सहकारासाठी मोदी सरकार 24 तास 365 दिवस उपलब्ध असणार आहे. मात्र, सहकारात आता पारदर्शकता आणावी लागेल असेही शाह म्हणाले. सध्या जिल्हा बँक संकाटात अडकल्या आहेत. कारण या बँकांमध्ये हजारो कोटींचे घोटाळे झाले आहेत. संकटात असलेल्या सर्व बँकांना संकटातून बाहेर काढणार असल्याचं त्यांनी सांगितले. विखे पाटील यांनी उभारलेला सहकारी साखर कारखाना हा सहकारमधील उत्तम मॉडेल आहे. या कारखान्याचे प्रशासन उत्तम असल्याचे शाह म्हणाले.