सांगली : सांगली जिल्ह्यातील करोली एम गावात कुत्र्यांना विषबाधा झाली आहे. अंदाजे 50 ते 100 कुत्री लकवा मारलेल्या अवस्थेत आढळून आली आहेत. या कुत्र्यांना ग्रामस्थांनी मिरजेत उपचारासाठी दाखल केले आहे.  गावातील सरपंच वस्ती आणि हणमंतपूर ह्या दोन वस्तीवरील सुमारे 100 कुत्र्यांना ही विषबाधा झाली आहे. शनिवारी सायंकाळी ही कुत्री शेतात आणि वस्तीवर लकवा मारलेल्या अवस्थेत आढळून आली.


यातील काही कुत्री ही वस्तीवरील पाळीव कुत्री असल्याने त्यांच्या मालकांनी उपचारासाठी मिरज शासकीय पशु वैद्यकीय रुग्णालयात त्यांना नेलं आहे. कुत्र्यांना त्रास जाणवू लागताच शेतात, वस्तीवर अर्धवट बेशुद्धावस्थेत कुत्री आढळली. ज्यानंतर नागरिकांनी त्यांना टेम्पोतून मिरजेत आणून त्यांच्यावर उपचार सुरू केले. पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी देखील या कुत्र्यांना विष बाधा झाली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे.


दगावलेल्या कोंबड्यामुळे विषबाधा?


करोली एम या गावामध्ये हा सगळा प्रकार घडला असून याच ठिकाणी काही दिवसांपूर्वी गावांमधील काही कोंबड्या अचानक दगावल्या  होत्या. या कोंबड्या ज्या ठिकाणी फेकून दिल्या त्याच कोंबड्या या कुत्र्यांनी खाल्ल्याने ही विषबाधा झाल्याचा अंदाज आहे. आता नेमक्या कोंबड्या कशाने  दगावल्या होत्या, त्यांना काही आजार झाला होता का? आणि त्याच खाल्याने कुत्र्यांना विषबाधा झाली आहे का? असे विविध अंदाज व्यक्त करण्यात येत आहेत. दरम्यान गावामध्ये दगावलेली जनावरं, कोंबड्या या साऱ्या सर्रासपणे फेकून दिल्या जात असल्याने अशा प्रकारच्या घटना समोर येत असून याबाबत प्रशासनासह नागरिकांनी योग्य पाऊलं उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.


महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha