मुंबई : एकीकडे शिवसेना मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची तयारी करत असताना दुसरीकडे आता शिवसेनेतील अंतर्गत कलह उघड झाला आहे. शिवसेना नेते रामदास कदम  (Ramdas Kadam) यांनी राज्याचे मंत्री अनिल परब आणि उदय सामंत यांच्यावर आरोप केल्यानंतर आता राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. मी शिवसेनेत आल्यानंतर मी शिवसेनेच्या विरोधात काम केलं तर मी प्रायश्चित्त करायला तयार आहे असं राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे. 


रामदास कदमांच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना उदय सामंत म्हणाले की, "2014 च्या अगोदर मी शिवसेनेचा विरोधक म्हणून काम करत होतो. तोपर्यंत माझी फार मोठी निष्ठा शिवसेनेशी नव्हती. मी शिवसेनेत आल्यानंतर शिवसेनेच्या विरोधात काम केलं असेल तर मी प्रायश्चित्त करायला तयार आहे. रामदास कदम यांच्यासारख्या जेष्ठ नेत्यांना आम्हाला बोलायचा, कान धरायचा अधिकार आहे."


दुसरीकडे रामदास कदम यांच्या आरोपांवर परिवहनमंत्री अनिल परब यांनी बोलणं टाळलंय. तर काही चुकत असल्यास कदम यांना कान धरण्याचा अधिकार आहे असं म्हणत मंत्री उदय सामंत यांनी या आरोपांना बगल देण्याचा प्रयत्न केला आहे.  


आज पत्रकार परिषदेत बोलताना रामदास कदम यांनी म्हटलं की, अनिल परब यांनी मनसे आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकारी यांना हाताशी धरुन आम्हाला संपवण्याचा प्रयत्न केला आहेत. स्थानिक आमदारांना डावलून सातत्याने आमच्या मुळावर उठण्याचे काम अनिल परब यांनी केले आहे. गद्दार कोण हे महाराष्ट्राच्या शिवसैनिकांना कळले पाहिजे. अनिल परबांना मंत्रीपद मिळाल्यानंतर ते पक्षासोबत गद्दारी करत आहेत, असा आरोप रामदास कदमांनी केला आहे.


माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पत्र लिहून आपली कैफियत मांडली आहे. शिवसेनेशी बेईमानी करत मनसे व राष्ट्रवादीच्या पुढाऱ्यांना सोबत घेऊन शिवसेना आणि रामदास कदमला संपविण्याचा घाट घालत आहेत, त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी या पत्रातून केली आहे.  


रामदास कदम यांनी आपल्या पत्रात काय म्हटलंय...
रामदास कदम यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, उद्धवजी पुन्हा आपल्याला हात सोडून सांगतो की, आम्हाला बाजूला ठेवून ज्यांना विश्वासाने मंत्रिपद दिले. ते कुणाची घरे फोडणे, शिवसेना नेत्याला इतर पक्षांच्या पुढाऱ्यांना हाताशी धरून संपवणे अशी कामे करत आहेत. कृपा करून त्यांना थांबायला सांगावे, अशी विनंती त्यांनी केली आहे. पत्रात पुढे म्हटले आहे की, सूर्यकांत दळवी माझ्यावर वारेमाप टीका करतो. ग्रामपंचायत निवडणुका, पंचायत व जिल्हा परिषद निवडणुका, विधासनभा निवडणूक, लोकसभा निवडणूक, नगरपालिका निवडणूक या सर्व निवडणुकांमध्ये त्याने उघडपणे शिवसेनेच्या विरोधात काम केले आहे, अशी तक्रारही त्यांनी केली आहे.


संबंधित बातम्या :