मुंबई : राज्यासह देशभरात सध्या होळीचा उत्साह आहे. आज धूळवडीनिमित्त ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
राज्यात अनेक ठिकाणी आज धूळवड खेळली जाते. रंगांची उधळण केली जाते. कोकणात होळीच्या सणाला विशेष महत्त्व आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गात 8 ते 15 दिवसांचा शिमगा साजरा केला जातो.
कालपासून होळीच्या सणाला सुरुवात झाली. कोकणात पारंपरिक पद्धतीने होळीचं पूजन करुन होलिकादहन करण्यात आलं. होळीसाठी चाकरमानीही कोकणात दाखल झाले आहेत.
होळीसाठी जंगलातील एक झाड निवडलं जातं. होळीच्या मुहूर्तावर वाजतगाजत ते झाड तोडून गावात आणलं जातं. या झाडाभोवतीच होळी रचली जाते. होळीच्या पूजनानंतर होलिकादहन पार पडतं. त्याच ठिकाणी आज धूळवड खेळली जाते.
यानंतर गावात 5, 7 तसंच 15 दिवसांची होळीही खेळली जाते. कोकणासह गोव्यातही शिमगोत्सवाला मोठं महत्त्व आहे.
मुंबईत वरळीमध्ये काल गुरुवारी रात्री नीरव मोदीच्या प्रतिकात्मक होळीचं दहन करण्यात आलं, तर औरंगाबादेत कचराप्रश्नावरुन नारेगावच्या ग्रामस्थांनी प्रशासन आणि महापालिकेच्या नावाने शिमगा केला.
पंतप्रधान मोदींकडूनही होळीच्या शुभेच्छा
होळीच्या पवित्र सणाच्या देशवासियांना खूप खूप शुभेच्छा! असं ट्विट करत पंतप्रधान मोदींनी सर्वांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत
https://twitter.com/narendramodi/status/969386406303875073