Holi 2023 : देशभरात आज धुळवडीचा उत्साह दिसून आला. महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी पांरपरीकपणे धुळवड साजरी करण्यात आली. रंगांची उधळण करत डीजेच्या तालावर तरुणाई थिरकताना दिसली.. मुंबई, पुण्यासह राज्यभरातील शहरात आज रंगाचा सण साजरा करण्यात आला. पण याच सणाला मुंबई आणि पुण्यात गालबोट लागलेय. धुलवडीला मुंबई आणि पुण्यात बुडून मृत्यू झाला आहे. पुण्यातील मावळ येथे रंग धुण्यासाठी गेलेल्या एका युवकाचा बुडून मृत्यू झाला तर मुंबईत जुहू समुद्रावर होळी खेळायला गेलेल्या तुरुणाचा बुडून मृत्यू झाला.
मुंबईत एका तरुणाचा बुडून मृत्यू
मुंबईतील जुहू समुद्रावर होळी खेळायला गेलेल्या एका तरुणाचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. होळीचा सण असल्याने आज मुंबईतील समुद्रकिनाऱ्यावर मुंबईच्या कानाकोपऱ्यातून नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. आज सायंकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास एक 26 वर्षीय तरुण समुद्रात पोहण्यासाठी गेला असता पाण्याचा अंदाज न आल्याने तो समुद्रात बुडू लागला. घटनेची माहिती कळताच घटनास्थळी पोलीस कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान आणि इतर अधिकारी यांनी दाखल होऊन शोध कार्य सुरू करून बुडणाऱ्या तरुणाला बाहेर काढले. त्यानंतर जवळच्या महापालिकेच्या कुपर रुग्णालयात नेले. मात्र तिथे डॉक्टरांनी त्या तरुणाला मृत घोषित केले. याप्रकरणी सांताक्रूझ पोलिसांनी एडीआर दाखल केला असून पोलीस अधिक तपास करत आहे.
मावळमध्ये एकाचा मृत्यू
मावळमध्ये धुळवड खेळून रंग धुण्यासाठी गेलेल्या एकाचा इंद्रायणी नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. जयदीप पाटील अस मृत्यू झालेल्या युवकाचं नाव आहे. सात ते आठ जणांचा ग्रुप धुळवड खेळून झाल्यानंतर रंग धुण्यासाठी मावळ मधील वराळे गावामधील इंद्रायणी नदी परिसरात गेले होते. त्यावेळी मयत जयदीप आणि त्याचे काही मित्र रंग धुण्यासाठी पाण्यात उतरेल असता नदीच्या खोलीचा अंदाज न आल्याने जयदीप पाटील यांचा नदीत बुडून मृत्यू झाला. वराळेमधील डॉ डी.वाय. पाटील महाविद्यालयात हे सर्व विद्यार्थी शिक्षण घेत होते तर मयत विद्यार्थी जयदीप पाटील हा मूळचा जळगाव जिल्ह्यातील तारखेड गावातील रहिवासी आहे.
तळीरामाने वर्सोवा खाडीतील खारफुटीला लावली आग!
अंधेरी पश्चिमेकडील वर्सोवा भागात तळीरामांच्या टोळीने वर्सोवा सातबंगला खाडीतील खारफुटीला मोठी आग लावल्याची घटना घडली आहे. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही आग लागल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी पोहोचून अर्धा तासात आगीवर नियंत्रण मिळवणे अग्निशमन दलाला यश मिळाले.
73 तळीरामांवर वाहतूक पोलिसांची कारवाई
मुंबईत तब्बल दोन वर्षांनंतर होळी आणि धुळवड मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मुंबईत वाहतूक पोलिसांनी नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याच्या सूचना केल्या होत्या शिवाय दारू पिऊन वाहने चालू नये, असे देखील आवाहन केले होते. मात्र यानंतरही मुंबईत मोठ्या प्रमाणावर तळीराम वाहन चालवताना आढळून आले. मुंबई वाहतूक पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या कारवाईत तब्बल 65 दुचाकी चालक व 8 चार चाकी वाहन चालक तळीरामांवर कारवाई केली आहे.