मुंबई : कोणतीही चळवळ यशस्वी होण्यासाठी कल्पना आणि लोकसहभाग महत्वपूर्ण असतो. जसा सक्रीय लोकसहभागातून विकास पूर्णत्वास जातो तसेच समाजाचा सर्वांगिण विकास होण्यासाठी नवकल्पना महत्वपूर्ण ठरतात. अशाप्रकारे जिल्ह्याचा आणि ग्रामीण भागाचा विकास हा केंद्रबिंदू मानून नवकल्पनांच्या माध्यमातून येणाऱ्या काळात विकास गाठू असे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी आज केले.
‘हिरकणी महाराष्ट्राची’ आणि ‘जिल्हा व्यवसाय नियोजन स्पर्धा’ या दोन महत्वाकांक्षी योजनांचे आज मंत्रालयातील मुख्यमंत्री वॉर रुम येथे उद्घाटन करण्यात आले.
प्रभू म्हणाले, जागतिक पातळीवर महिला उद्योजकांची संख्या वाढविण्यासाठी तसेच महाराष्ट्रातील महिला उद्योजकांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी “हिरकणी महाराष्ट्राची” हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. महिलांना आर्थिक स्वातंत्र्य देण्यासाठी, तसेच राज्याच्या पर्यायाने देशाच्या विकासात सहभाग देण्यासाठी कौशल्य विकास विभागाने हे नवे व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. महिलांना आर्थिक स्वातंत्र्य देण्यासाठी 'हिरकणी महाराष्ट्राची' ही स्पर्धा आता कौशल्य विकास व उद्योजकता विभागामार्फत घेतली जाणार आहे. आजच्या महिला या स्वयंपूर्ण आहेत त्यामुळेच त्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळणेही तितकेच गरजेचे आहे.
हिरकणी महाराष्ट्राची ही ग्रामीण महिलांची ओळख बनेल - संभाजी पाटील- निलंगेकर
ग्रामीण भागातील महिलांमध्ये असलेल्या कल्पनाशक्तीला हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न 'हिरकणी महाराष्ट्राची'मधून करण्यात येणार आहे. याची सुरुवात लातूर आणि चंद्रपूर येथून होणार आहे. हिरकणी महाराष्ट्राची या योजनेअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यातील बचतगटांच्या सदस्यांना, महिलांच्या कल्पनांना कौशल्य प्रशिक्षणातून व्यासपीठ उपलब्ध करुन दिले जाणार आहे. प्रत्येक तालुका, जिल्हास्तरावर हिरकणी कॅम्पचे आयोजन करुन महिला उद्योजक, बचतगटातील महिलांना प्रशिक्षण देऊन त्यांच्या नवीन संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी हक्काचे व्यासपीठ आणि बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातून एका हिरकणीची तर निवडलेल्या सर्व जिल्ह्यांच्या हिरकणींमधून राज्यस्तरीय हिरकणीची निवड करण्यात येणार आहे. राज्यस्तरासाठी निवडलेल्या हिरकणीचा सन्मान केला जाणार आहे. हिरकणी महाराष्ट्राची ही ओळख बनेल, असा विश्वास कौशल्य विकास मंत्री यांनी व्यक्त केला.
हिरकणी महाराष्ट्राची...
हिरकणी महाराष्ट्राची असे आगळेवेगळे नाव देण्याची पार्श्वभूमी थोडी वेगळी आहे. हिरकणी हे नाव सर्वांना माहित आहे. रायगडावर दुध घालणारी गवळण हिरकणी होती. गडाचे दरवाजे बंद झाल्यावर माझ्या लेकराचं कसं होईल या भीतीने रात्रीच्या बुरुजावरुन उतरली आणि तिचा हा असामान्य पराक्रम पाहून छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्या बुरुजाला हिरकणीचे नाव दिले. येणाऱ्या काळात हिरकणी हे ब्रँडनेम करण्यासाठी सिम्बॉल मागविण्यात येणार आहे. जे सिम्बॉल उत्कृष्ट असेल त्याला 1 लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे.
राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, प्रधानमंत्री यांना भेटण्याची संधी
या स्पर्धेत विजयी होणाऱ्या उद्योजक महिलांना उपलब्धतेनुसार राष्ट्रपती, उपराष्ट्रपती किंवा प्रधानमंत्री यांना भेटण्याची संधी उपलब्ध होणार आहे. तसेच त्यांच्या नवनवीन कल्पना वर्ल्ड इकॉनॉमीक फोरम यांसारख्या माध्यमातून जागतिक पातळीवर नेऊन युएन, वर्ल्ड बँक च्या माध्यमातून आर्थिक सहाय्य व बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचेही प्रभू यांनी सांगितले.
महिलांना आर्थिक स्वातंत्र्य देण्यासाठी 'हिरकणी महाराष्ट्राची'
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
09 Feb 2019 08:20 PM (IST)
प्रत्येक जिल्ह्यातून एका हिरकणीची तर निवडलेल्या सर्व जिल्ह्यांच्या हिरकणींमधून राज्यस्तरीय हिरकणीची निवड करण्यात येणार आहे. राज्यस्तरासाठी निवडलेल्या हिरकणीचा सन्मान केला जाणार आहे. हिरकणी महाराष्ट्राची ही ओळख बनेल
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -