हिंगोली : सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषींना फाशीची शिक्षा सुनावून हिंगोलीच्या न्यायालयानं ऐतिहासिक निकाल दिला आहे. पाच वर्षीय चिमुकलीवर बलात्कार करुन तिची हत्या करणाऱ्या दोन नराधमांना हिंगोली जिल्हा न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली आहे.
राहुल क्षीरसागर आणि भागवत क्षीरसागर अशी फाशी सुनावण्यात आलेल्या दोषींची नावं आहेत. तर या प्रकरणातील इतर पाच आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली.
सात जानेवारी 2016 ला कळमनुरी तालुक्यातल्या वारंगा मसाईमध्ये 5 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. त्यानंतर आरोपींनी मुलीच्या तोंडात कापसाचा गोळा कोंबून तिची हत्या केली.
पीडित चिमुकलीला तात्काळ न्याय मिळावा म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाही काढण्यात आला होता. सव्वा वर्षांच्या आत 25 जणांची साक्ष नोंदवल्यानंतर जिल्हा न्यायालयानं राहुल क्षीरसागर आणि भागवत क्षीरसागर यांना मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली आहे.