खेळातील दोन कोटींच्या नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न, पाच अटकेत
एबीपी माझा वेब टीम | 14 Aug 2017 05:51 PM (IST)
या नोटांवर 'भारतीय बच्चों का बँक' असं लिहिलेलं आहे. बॉक्समध्ये वर खऱ्या नोटा ठेऊन खाली लहान मुलांच्या नोटा ठेवण्यात आल्या होत्या.
हिंगोली : 50 लाखांच्या मोबदल्यात लहान मुलांच्या खेळातील दोन कोटींच्या नोटा दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हिंगोलीमध्ये फसवणुकीचं हे अनोखं उदाहरण पाहायला मिळत आहे. या प्रकरणी पाच आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. हिंगोलीत स्थानिक गुन्हे शाखेने हा प्रकार उघडकीस आणला आहे. 50 लाख रुपयांच्या खऱ्या नोटांच्या बदल्यात दोन कोटी रुपयांच्या बनावट नोटा देण्याच्या प्रयत्नात असलेल्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला. विशेष म्हणजे या नोटा खोट्याच नाहीत, तर लहान मुलांच्या खेळातील आहेत. या नोटांवर 'भारतीय बच्चों का बँक' असं लिहिलेलं आहे. बॉक्समध्ये वर खऱ्या नोटा ठेऊन खाली लहान मुलांच्या नोटा ठेवण्यात आल्या होत्या. या प्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असुन एक इंडिका कार आणि दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. यामागे आणखी कोण आहे का, याचा तपास सुरु आहे. यापूर्वीही औंढा नागनाथ येथे असंच एक रॅकेट पोलिसांनी पकडलं होतं.