Hingoli Pik Vima protest: राज्यात एक रुपयात पिकविमा योजनेचा (Crop Insurance) बोजवारा उडाल्याचे चित्र दिसत असून राज्यातील शेतकऱ्यांचे पिकविम्याचे अर्ज फेटाळण्यात आल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. गेल्या वर्षी खरीप (Kharif) आणि रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी पीक विमा मोठ्या प्रमाणात भरला खरा पण पावसाचा खंड आणि नंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे क्लेम करूनही पिकविमा मिळत नसल्याने हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यात शेतकरी आक्रमक झाले आहेत.


शेतकऱ्यांचे कृषी अधीक्षक कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन


शेतकऱ्यांनी कृषी अधीक्षक कार्यालयासमाेर ठिय्या आंदोलन (Pik vima protest) सुरु केले असून जोपर्यंत पिक विमा मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा पवित्रा घेतला आहे. पिकविम्याच्या मागणीसाठी सोमवारीही तालुक्यात एक आंदोलन झाले. यावेळी कार्यालयांची तोडफोड करण्यात आल्याचे सांगण्यात आले.


विमा कंपनीच्या कार्यालयात तोडफोड


हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विमा मिळत नसल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी सोमवारी हिंगोली शहरातील पिकविमा कंपनीचं कार्यालय फोडलं आहे. गेल्या वर्षी पावसाचा पडलेला खंड आणि अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. दरम्यान, या काळात अनेक शेतकऱ्यांनी नुकसान तक्रारीही दिल्या त्यानंतर शेतकऱ्यांना विमा मंजूरही झाला, परंतु तो विमा परतावा शेतकऱ्यांना मिळत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी हिंगोली शहरातील हनुमाननगर भागात असलेल्या  पिक विमा कंपनीच्या कार्यालयात तोडफोड केली आहे .


पिकविमा योजनेत शेतकऱ्यांच्या आशा पाण्यात 


हिंगोली जिल्ह्यांमध्ये गेल्या वर्षी खरीप आणि रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पीक विमा भरला. राज्य शासनाने एक रुपयात पिकविमा ही योजना सुरू केल्यानंतर शेतकऱ्यांनी हा विमा मोठ्या प्रमाणात भरला होता. परंतु, मागील वर्षी आधी पावसाचा खंड पडला आणि नंतर अतिवृष्टीने पावसाचे मोठे नुकसान झाले. परिणामी शेतकऱ्याला सरकारकच्या या योजनेतून तरी काही पैसे मिळतील अशी आशा होती. पण, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या या आशा पाण्यात गेल्याचे पहायला मिळत आहे.


पिकविमा कंपनीच्या कारभारावर ठेवले बोट


राज्यभरात सध्या सरकारसह पिकविमा कंपनीच्या कारभारावर बोट ठेवले जात असून छत्रपती संभाजीनगरसह अकोला, हिंगोली जिल्ह्यात पिकविम्यापासून शेतकऱ्यांना वंचित ठेवले जात असल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून होत आहे. आक्रमक शेतकरी जिल्ह्यातील कृषी अधीक्षकांच्या कार्यालयाकडे धाव घेत असून गोंधळाचे वातावरण आहे.


छत्रपती संभाजीनगरमधील ७० टक्के नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे दावे फेटाळले


छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) नोव्हेंबर 2023 मध्ये झालेल्या अतीवृष्टीमुळे (heavy rain) झालेल्या नुकसानीत विमा कंपनीने 70 टक्के शेतकऱ्यांचे (Farmers) दावे फेटाळले आहेत. संभाजीनगर जिल्ह्यात ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये अतिवृष्टी झाली होती. या नुकसानीत 680548 शेतकऱ्यांनी विमा कंपन्यांना पूर्व सूचना दिल्या होत्या. त्यापैकी विमा कंपन्यांनी 229155 दावे स्वीकारले तर 451393 दावे फेटाळले आहेत. यामुळं शेतकरी आक्रमक झाले आहेत.


कृषी अधिकार्‍यांसह विमा कंपनीच्या प्रतिनिधींना शेतकऱ्यांनी कार्यालयात डांबलं


अकोला जिल्ह्यातील अकोट तालूक्यात जवळपास पावणेदोनशे शेतकरी केळीच्या पीकविम्यापासून वंचित आहेत. वेळोवेळी याबाबत तक्रार करूनही संबंधित प्रशासनाने अद्याप कुठलीही उपाययोजना अथवा ठोस आश्वासन दिलेले नाही. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आज थेट कृषि अधिकारी, विमा कंपनी अधिकार्‍यांसह स्वत:ला डांबून घेतलं होतं.


विम्याचे जवळपास 4.75 कोटी रुपये थकीत असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे ठोस निर्णय घेतल्याशिवाय कृषी अधिकारी आणि विमा प्रतिनिधींना कार्यालयातच डांबून ठेवणार असल्याचा आक्रमक पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला होता.


हेही वाचा:


कृषी अधिकार्‍यांसह विमा कंपनीच्या प्रतिनिधींना शेतकऱ्यांनी कार्यालयात डांबलं; पीक विम्यापासून वंचित शेतकऱ्यांचा संताप


विमा कंपनीनं 70 टक्के नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे दावे फेटाळले, आज संध्याकाळपर्यंत उत्तर द्या अन्यथा....शेतकरी आक्रमक