हिंगोली: मुलीच्या छेडछाडीवरुन हिंगोलीत एका तरुणाचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील तलाब पट्टा भागातील शुभम राजे आणि बबलू धाबे यांच्यात मुलीच्या छेडछाडी वरून वाद झाला आणि या वादाचा बदला घेण्यासाठी बबलू धाबे आणि त्याच्या अन्य दोन मित्रांनी 18 एप्रिल रोजी रात्री शुभमला बोलावून धारदार शस्त्राने मारहाण केली. यात शुभमचा मृत्यू झाला.
हिंगोली शहरातील रहिवाशी असलेल्या शुभम राजे आणि बबलू धाबे या दोघांचे मुलीच्या छेडछाडीवरून काही दिवसापूर्वी वाद झाला होता. हा वाद तात्पुरत्या स्वरूपात मिटला होता. परंतु नंतर काही दिवसांनी, 18 एप्रिलला या वादाचा बदला घेण्यासाठी बबलू धाबे आणि त्याच्या दोन मित्रांनी शुभमला रात्री भेटण्यासाठी बोलवले. शुभम भेटायला आल्यावर बबलू आणि त्याच्या दोन साथीदारांनी शुभमवर धारदार शस्त्र आणि लोखंडी रॉडने सपासप वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे शुभम जागीच कोसळला. यात शुभमचा मृत्यू झाला.
घटना स्थळाहून बबलू धाबे आणि त्याचे दोन साथीदार फरार झाले होते. याची माहिती पोलिसांना कळताच तात्काळ हिंगोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. शुभमला रुग्णालयात दाखल केले आणि पोलिसांनी घटनस्थळाचा पंचनामा केला.
या प्रकरणी शुभमची आई शोभा राजे यांच्या तक्रारीवरून बबलू धाबे आणि त्याच्या अन्य दोन साथीदारांच्या विरोधात खुनाचा गुन्हा हिंगोली शहर पोलिसात दाखल करण्यात आला. 19 एप्रिल रोजी हिंगोलीचे पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणी लक्ष घातले. सकाळी लवकरच हिंगोली पोलीस स्टेशन गाठून घडलेल्या घटनेची माहिती घेतली आणि घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणातील तपास लवकरात लवकर करून आरोप पत्र न्यायालयात सादर करण्याच्या सूचना त्यांनी पोलिसांना दिल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशन राबवून या प्रकरणातील तीनही आरोपींना हिंगोली शहरातील खुशाल नगर भागातून अटक केल्याची माहिती आहे.
मंगळवारी या आरोपींची वैद्यकीय तपासणी आणि अन्य कायदेशीर प्रक्रिया करून आरोपींना हिंगोली कोर्टात दाखल करण्यात आले होते. त्यावरून हिंगोली कोर्टाने या आरोपींना 6 दिवसांची म्हणजेच 25 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- Nashik News : नाशिकच्या कारागृहातील खळबळजनक प्रकार, तुरुंग अधिकाऱ्यानेच केली कैद्याची मदत
- Daund Crime : भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी केल्याचा राग, 23 जणांच्या टोळक्याचा पोलिसासह मित्रांवर जीवघेणा हल्ला
- Cyber Cell : सोशल मीडियावर पोस्ट करताना सावधान! इनबॉक्समध्ये दिसेल सायबर पोलिसांची 'ही' नोटीस, आतापर्यंत 400 नोटीस पाठवल्या