वर्धा : राज्यभर गाजलेल्या हिंगणघाट येथील प्राध्यापिकेच्या जळीतकांड प्रकरणाच्या प्रत्यक्ष सुनावणीला सुरूवात झाली आहे. हिंगणघाटच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.एन. माजगावकर यांच्या न्यायालयात तीन जणांची साक्ष नोंदवण्यात आली आहे.


हिंगणघाट येथे विक्की उर्फ विकेश नगराळे याने प्राध्यापिकेच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्यात आलं होतं. उपचारादरम्यान पीडितेचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी विकेश नगराळेवर गुन्हा दाखल करून अटक केली होती. या प्रकरणाची सुनावणी हिंगणघाट येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात होत आहे. शासनाच्या वतीने फिर्यादी पक्षाकडून विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी युक्तीवाद केला आहे.


आरोपी विक्की उर्फ विकेश नगराळेकडून नागपूरचे अ‍ॅड. भूपेंद्र सोने यांनी बाजू मांडली आहे. यावेळी साक्षीदारांची उलट तपासणीही करण्यात आली. न्यायालयीन कारवाईच्यावेळी आरोपी विकेश नगराळे यास न्यायालयात उभे करण्यात आले. 12 आणि 13 जानेवारी रोजी इतर साक्षीदारांची साक्ष घेण्यात येणार असल्याची माहिती वकिलांच्या वतीने देण्यात आली. यावेळी न्यायालयाच्या परिसरात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता.