Pune Bypoll election :  पुण्याच्या पोटनिवडणुकीसाठी (pune bypoll election) उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. जितक्या जास्त उमेदवारांनी  अर्ज मागे घेतला तितका जास्त फायदा भाजप आणि महाविकास आघाडीला होणार आहे. यामुळे मत फुटण्याची शक्यता कमी होणार आहे. यात संभाजी ब्रिगेड आणि आम आदमी पार्टीने या पोटनिवडणुकीतून माघार घेतली आहे. पक्षांच्या वरिष्ठांच्या आदेशाने निवडणुकीतून माघार घेतली असल्याचं सांगितलं जात आहे. 


संभाजी ब्रिगेड पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड या दोन्ही पोटनिवडणूकीतुन माघार घेतली आहे. पुण्यातील कसबा आण चिंचवडच्या पोटनिवडणुकीसाठीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आज शेवटी तारीख आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते सचिन अहिर यांनी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली आणि उमेदवारी अर्ज मागे घेऊन शिवसेनेला पाठिंबा देण्याची विनंती केली. या विनंतीला मान देऊन दोन्ही मतदारसंघाच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रमुख पुरुषोत्तम खेडेकर यांनी ही माहिती दिली आहे. 


आम आदमी पक्षाचीही माघार


संभाजी ब्रिगेडनंतर आम आदमी पार्टीच्या उमेदवारांनीदेखील उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील कसबा, चिंचवड पोटनिवडणूक लढवण्यासाठी पक्ष सज्ज झाले होते. मात्र त्यांनी आता निवडणुकीतून माघार घेतली आहे. या निवडणुकीसाठी आपचे प्रभारी गोपाळ इटालिया पुण्यात आले होते. त्यांनी आता पुण्याच्या पोटनिवडणुकीत न उतरण्याचा निर्णय घेतला आहे. आम आदमी पार्टी महाराष्ट्र राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्यासाठी सज्ज होत आहे. त्यानुसार पक्ष  श्रेष्ठींच्या आदेशानुसार किरण कद्रे यांनी कसबा विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ताकतीनिशी लढू आणि त्यानंतर आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका देखील जोमाने लढवणार आहोत, असं आम आदमी पक्षातर्फे सांगण्यात आलं आहे.


राहुल कलाटेंच्या उमेदवारी अर्जाकडे सर्वांची नजर


यात सगळ्यात जास्त चर्चेचा विषय ठरलेला उमेदवारी अर्ज असेल तर तो चिंचवडच्या शिवसेनेच्या राहुल कलाटे यांचा आहे. त्यांनी निवडणूक अर्ज मागे घ्यावा, यासाठी महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांकडून विनवणी केली जात आहे. आतापर्यंत उद्धव ठाकरे, अजित पवार, सुनील शेळके आणि आता शिवसेनेचे सचिन अहिर यांनीदेखील त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला आहे. तीन वाजता अर्ज मागे घेण्यासाठी वेळ आहे. मात्र अजूनही राहुल कलाटेंनी निवडणूक अर्ज मागे घेतलेला नाही.