मुंबई :  रस्ते अपघातात बळी पडलेल्यांना नुकसानभरपाई देताना त्यांच्या शारीरिक दुखापतींबरोबरच त्यांच्यावर झालेल्या मानसिक आघाताचाही विचार व्हायला हवा. असं महत्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयानं एका निकालात नोंदवत नुकसानभरपाई देण्याविरोधात हायकोर्टाची पायरी चढलेल्या विमा कंपनीची याचिका फेटाळून लावताना नुकसान भरपाई आणखीन वाढवून देण्याचे निर्देश दिले आहेत.


काय घडली होती घटना?


साल 2014 मध्ये मुंबई झालेल्या एका भीषण अपघातात 37 वर्षीय समीरा पटेलच्या एका डोळ्याची दृष्टी गेली तर तिची 19 वर्षीय मुलगी झुलेकानं आपली ऐकण्याचा क्षमता गमावली. कोणताही सिग्नल न देता रस्त्याच्या मधोमध उभ्या ट्रेलरला त्यांची कार धडकली होती. आघात इतका जोरदार होता की, गाडीचा चक्काचुर झाला आणि समीरासह तिची मुलगी झुलेकाला मोठ्या प्रमाणाता मार लागला होता. ज्यात झुलेकाच्या चेहऱ्याचा भाग शस्त्रक्रियेतून बसवावा लागला. साल 2019 मध्ये मोटार वाहन अपघात न्यायाधिकरणाने विमा कंपनीला समीरा पटेलला 20 लाख आणि मुलगी झुलेकाला 22 लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे निर्देश दिले होते. त्या निर्णयाला इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनीनं मुंबई उच्च न्यायालयात आव्हानं होत. त्यावर नुकतीच न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्यासमोर सुनावणी पार पडली.


हायकोर्टाचा निकाल -


या मायलेकींचे शारीरिक, मानसिक आणि भविष्यातील आशा आकांशाच्याबाबतीत झालेलं नुकसान आर्थिक रुपात मांडता येणार नाही. या अपघातातून सावरताना मायलेकींना असहायत्तेची भावना दाटून आली आहे. या दुर्घटनेनंतर त्यांचे आयुष्य पार विस्कटून गेलं. समीरा पटेल यांना एकूण पाच अपत्य असून त्यात दोन जुळ्या मुलींचा समावेश आहे. अपघातानंतर आलेल्या शारीरिक मर्यादांमुळे त्यांच्यासमोर कुटुंबियांच्या उदरनिर्वाहाचाही प्रश्न निर्माण झाला आणि दुसऱ्याची मदत घेण्याची वेळ आल्याची माहिती महिलेकडून न्यायालयात देण्यात आली. अपघाताच्या आधी मुलगी झुलेका ही एक अॅथलीट होती, तिला क्रिडा क्षेत्रात कारकिर्द घडवायची होती. मात्र, या अपघातामुळे तिला आपल्या स्वप्नांवर, इच्छांवर पाणी सोडावं लागलं. तसेच भविष्यात लग्न करून एक सुखी वैवाहिक आयुष्य जगण्याच्या तिच्या आशा ही संपुष्टात आल्या. ही सारी परिस्थिती त्यांना अपघाताच्या तीव्र मानसिक धक्क्यामुळेच उद्भवली आहे. त्यामुळे अशा अपघातांमुळे येणारा मानसिक धक्काही विचारात घेणं अत्यावश्यक आहे. लवादाने निकालात मुलीच्या शारीरिक उपचारांचा खर्च आणि लग्न करू न शकण्याच्या हतबल परिस्थितीचा विचार केलेला नव्हता. याची नोंद करत हायकोर्टानं आईला 2 तर मुलीला 3 लाख रुपये नुकसानभरपाई वाढवून देण्याचे निर्देश विमा कंपनीला देत त्यांची याचिका फेटाळून लावली.


दोषी ट्रेलर चालक कोणत्याही वैध परवान्याशिवाय वाहन चालवत होता. तसेच ट्रेलरच्या मालकानं विम्याच्या अटींचा भंग केला होता.  त्यामुळे त्या मालकाला नुकसान भरपाईची रक्कम भरण्यास सांगितले पाहिजे, असा दावा विमा कंपनीकडून करण्यात आला. त्यावर कोर्टानं नाराजी व्यक्त करत मालकानं कायद्याचं उल्लंघन केलेलं असलं तरीही विमा कंपनीनंच नुकसान भरपाई देणं आवश्यक आहे. वाटल्यास ते नंतर त्या ट्रेलर मालकावर खटला दखल करून ही रक्कम परत घेऊ शकतात. या शब्दांत न्यायालयानं विमा कंपनीला खडे बोल सुनावलेत.