मुंबई : गुणरत्न सदावर्ते यांना मुंबई उच्च न्यायालयानं मोठा दिलासा दिला आहे. सदावर्तेंविरोधात पुण्यात दाखल झालेल्या एफआयआरमध्ये त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. तसेच याप्रकरणी त्यांना अटक झाल्यास त्यांची 25 हजारांच्या जामीन अर्जावर तात्काळ सुटका करण्याचे निर्देशही पुणे पोलिसांना दिले आहेत. दरम्यान सदावर्ते यांना कोल्हापूरहून आणल्यापासून त्यांनी आर्थर रोड जेलमध्ये उपोषण सुरू केल्याची माहिती कोर्टाला देण्यात आली. सदावर्ते यांनी अन्न न घेण्याचं ठरवल्यानं जेलमध्येच त्यांची वैद्यकीय तपासणी सुरू आहे, त्यामुळेच पुणे पोलिसांना ताबा मिळण्यात उशिर होत असल्याची माहिती सरकारी वकील अरूणा पै यांनी हायकोर्टाला दिली.

 


पुण्यातील भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात वकील गुणरत्न सदावर्तेंविरोधात गुन्हा दाखल आहे. ज्यात साता-यानंतर पुणे पोलीस सदावर्तेंचा ताबा घेण्याच्या तयारीत होते. त्यासाठी पुणे पोलिसांचं एक पथक मुंबईतील आर्थर रोड कारागृहात दाखल झालं होतं.


शरद पवार यांच निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओक या घरावरील हिंसक आंदोलन प्रकरणी सदावर्तेंना मुंबई सत्र न्यायालयानं जामीन दिलेला आहे. मात्र त्यानंतही सतत एका जिल्ह्यातील पोलिसांकडून दुस-या जिल्ह्यातील पोलिसांकडे त्यांचा ताबा दिला जात असल्यानं ते या जामीनातील अटीशर्तींची अद्याप पूर्तात करू शकलेले नाहीत. त्यामुळे जामीन मिळूनही सदावर्ते अद्याप जेलमध्येच आहेत.


 

एका वृत्तवाहिनीवर बोलताना एका विशिष्ट समाजाबद्दल सदावर्तेंनी काही आक्षेपार्ह वक्तव्य केली होती. त्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होईल असं वक्तव्य केल्याबद्दल सदावर्तेंविरोधात राज्यभरात विविध ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे त्यांना अटकेपासून दिलासा दिल्यास ते बाहेर आल्यावर पुन्हा तेच कृत्य करण्याची शक्यता आहे. तसेच ते वक्तव्य सदावर्तेंनीच केलं होतं यासाठी त्यांच्या आवाजाचे नमुने घेणं गरजेचं असल्यानं त्यांच्या कस्टडीची हवी आहे, असा युक्तिवाद राज्य सरकारच्यावतीनं सरकारी वकिल अरूणा पै यांनी केला होता. मात्र 9 ऑक्टोबर 2021 रोजी पुण्यात हा गुन्हा दाखल झाल्यानंतर सहा महिन्यांनी पोलिसांना कारवाईची आत्ताच गरज का वाटली?, त्यामुळे कुठेतरी पोलिसांवर दबाव असल्याचा आरोप सदावर्तेंच्यावतीनं त्यांचे वकील निरंजन मुंदरगी यांनी हायकोर्टात केला. तसेच सातारा पोलीसांनी याच संदर्भात दाखल अन्य गुन्ह्यात सदावर्तेंच्या आवाजाचे नमुने घेतले आहेत त्यामुळे त्यासाठी पुन्हा त्यांच्या कस्टडीची गरजच काय?, असा सवालही विचारण्यात आला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर याचिकाकर्त्यांच्या दाव्यात तथ्य दिसत असल्याचं स्पष्ट करत न्यायमूर्ती विनय जोशी यांनी सदावर्तेंना अटकपूर्व जामीन मंजूर केला. तसेच 4 ते 6 मे दरम्यान पुणे पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर होण्याचे निर्देश दिले आहेत.