Somnath Suryavanshi death case: संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलिस कोठडीतील मृत्यू प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने पोलिसांना झटका दिला आहे. खंडपीठात दाखल याचिकेवर सोमनाथ यांच्या कुटुबीयांकडून वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी स्वत: युक्तीवाद केला होता. या प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिल्याने पोलिसी कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले गेले आहेत. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूनंतर कुटुंबाने न्यायासाठी आक्रोश करताना शासकीय मदत सुद्धा नाकारली होती. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले होते. त्यामुळे या प्रकरणाची देशपातळीवर चर्चा झाली.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
परभणीमध्ये 10 डिसेंबर 2024 रोजी स्टेशन रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड करून विटंबना करण्यात आली होती. या विटंबनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी 11 डिसेंबर रोजी परभणी जिल्हा बंदची हाक दिली. बंददरम्यान परभणीत जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना घडल्या. त्यानंतर परभणी पोलिसांनी कोंबिग ऑपरेशन राबवत गुन्हे दाखल केले आणि सोमनाथ सूर्यवंशी यांनाही अटक केली. अटक केलेल्यांपैकी सोमनाथ सूर्यवंशी या 35 वर्षीय तरूणाचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला. सोमनाथ सूर्यवंशीच्या शरीरावर अनेक जखमा असल्याने सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक अहवालात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पोलिसांच्या अमानुष मारहाणीमुळेच सोमनाथचा मृत्यू झाल्याचा आरोप केला गेला. सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूस जबाबदार धरून परभणी एलसीबीचे पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना तातडीने बडतर्फ करण्याची मागणी आंबेडकरी अनुयायांनी केली होती.
सोमनाथची हत्या पोलिसांनीच केली, राहुल गांधींचा आरोप
सोमनाथ सूर्यवंशीची हत्या ही पोलिसांनीच केली आहे असा थेट आरोप लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी कुटुबीयांची भेट घेतल्यानंतर केला होता. 23 डिसेंबर 2024 रोजी राहुल यांनी कुटुबीयांची भेट घेतली होती. या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना पाठीशी घालण्यासाठी खोटं वक्तव्य केलं असल्याचा आरोपही त्यांनी केला. संविधानाचं रक्षण करणाऱ्या सोमनाथची हत्या करणाऱ्यावर कारवाई व्हावी अशी मागणी राहुल यांनी केली होती. राहुल गांधी म्हणाले की, पोस्टमार्टेम रिपोर्टमधून स्पष्ट झालंय की शंभर टक्के ही हत्या आहे. पोलिसांनीच न्यायालयीन कोठडीत असलेल्या सोमनाथची हत्या केली. सोमनाथ दलित असल्यानेच त्याची हत्या करण्यात आली. या प्रकरणाचा तपास व्हावा. या प्रकरणात राजकारण नको तर न्याय हवा.
इतर महत्वाच्या बातम्या