नागपूर: नागपुरात हेल्मेट सक्तीवरुन वाहतूक पोलिसांनी जोरदार मोहीम सुरु केली आहे. पण या हेल्मेट  सक्तीमध्ये पोलिसांवर मात्र कारवाई होताना दिसत नाही. शहरातील विविध भागात अनेकजण  एबीपी माझाच्या कॅमेऱ्यात हेल्मेटविना प्रवास करताना कैद झाले आहेत.

 

तर दुसरीकडे विना हेल्मेट प्रवास करणाऱ्या पोलिसालाही माझाच्या कॅमेऱ्यामुळे दंड भरावा लागला आहे. शहरात ठिकठिकाणी नाकेबंदी करुन विना हेल्मेट दुचाकी चालकांवर कारवाई केली जाते आहे.

 

दिसला विना हेल्मेट...  थांबवा गाडी... फाडा पावत्या

 

नागपूरच्या रस्त्यावर काल वाहतूक पोलिसांचा बक्कळ गल्ला जमला. ट्रफिक पोलिसांनी नियम मोडणाऱ्या अनेक वाहन चालकांकडून दंड वसूल केला. अखेर एका विना हेल्मेट पोलिसाला आम्हीच अडवलं.

 

नियम मोडणारे पोलीस महाशय माझाच्या कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर त्यांची बोलतीच बंद झाली. त्यानंतर त्यांच्याकडूनही ट्रॅफिक पोलिसांनी दंड वसूल केला. मात्र, या कारवाईनंतरही अनेक पोलीस विना हेल्मेट फिरत होते.

 

लोकासांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण... अशी अवस्था नागपूरच्याच नाही, तर राज्यभरातल्या पोलिसांची आहे. त्यामुळे आधी पोलिसांनी नियम पाळले तर लोक पाळतील. अन्यथा... ये रे माझ्या मागल्या...