कोपर्डी बलात्कार : महाराष्ट्रासाठी काळा दिवस : सुप्रिया सुळे
एबीपी माझा वेब टीम | 19 Jul 2016 05:00 AM (IST)
नवी दिल्ली : अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी बलात्कारप्रकरणी संसदेत आवाज उठवू अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार प्रिया सुळे यांनी एबीपी माझाला दिली. बलात्कार होऊन तीन दिवस लोटल्यानंतरही पोलिस यंत्रणा का दिरंगाई करतात, असा प्रश्न करत त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कारभारावर निशाणा साधला. महाराष्ट्राच्या पोलिसांचा आम्हाला अभिमान होता, पण नगरच्या घटनेत पोलिसांनी २ दिवस माहिती बाहेर येऊ नाही दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी लावायला एवढा उशीर का केला? असा सवाल सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला. महाराष्ट्र विधानसभेत पडसाद दरम्यान राज्य अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही कोपर्डी बलात्कार प्रकरणाचे पडसाद उमटण्याचे संकेत आहेत. कारण, विरोधक विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणणार आहेत. काल इतर विषय बाजूला ठेवून कोपर्डी प्रकरणावर चर्चा व्हावी, अशी मागणी विरोधकांनी केली होती. मात्र त्याला विधानसभाध्यक्षांनी नकार दिल्याचा आरोप काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं केला आहे.