उरण (रायगड) : रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील पश्चिम किनारपट्टीवर तेलाचा तवंग पसरला आहे. किनारपट्टीवरील काही भागात तेलाचे लहान गोळे आढळून आले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून रायगड जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यांवर तेलाचा तवंग आढळून येत आहे. पावसाळ्याच्या काळात दरवर्षी अशा पद्धतीने तेलाचा तवंग रायगड जिल्ह्याच्या पश्चिम किनारपट्टीवर आढळून येतो. यंदाही अशाच पद्धतीने मुरुड आणि अलिबाग समुद्र किनाऱ्यावर तेलाचा तवंग आढळून आला असून, गेल्या काही दिवसांपासून उरण तालुक्यातील किनारपट्टीवर तेलाचा तवंग आढळून आला आहे.

उरण शहरालगत असलेल्या दांडा ते पिरवाडी समुद्रकिनाऱ्यावर तेलाचा तवंग पसरला असून, काही भागात तेलाने भरलेले गोळे देखील आढळून आले आहेत. यामुळे उरणच्या या समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांना चालणे कठीण झाले आहे. तर, समुद्राच्या पाण्यात भिजायला येणाऱ्या चिमुरड्यांना देखील या पाण्यात भिजण्याचा आनंद घेता येत नाहीय.

दरम्यान, प्रदूषण नियंत्रण मंडळाने पाण्याचे नमुने घेऊन तपासणीसाठी नेण्यात आले आहेत. दरवर्षी येणाऱ्या या तेलाच्या तवंगावर ठोस उपाय करणे गरजेचे आहे.