मुंबई : राज्यात आज परतीच्या मान्सून पावसाने मेहगर्जना आणि विजांचा कडकडाटासह जोरदार हजेरी लावली. विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, अहमदनगच्या काही भागात पावसाने तुफान फटकेबाजी केली. तर परभणी, लातूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, बुलढाणा जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली. मराठवाड्यातही आज विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसला.


मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू असतानाच बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. जो आंध्र प्रदेशाच्या मार्गे जमिनीकडे सरकतोय. यामुळं येणाऱ्या चार दिवसांमध्ये महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांमधे दुपारनंतर विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्याचबरोबर 14 ऑक्टोबर नंतर अंदमान बेटांच्या भागात आणखी एक कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे. तो झाल्यास पुन्हा त्यानंतर देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे.


परभणी जिल्ह्यात अनेक दिवसांनंतर पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील सेलु, कुपटा, वालूर तसेच पुर्णा या दोन तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झालाय तर पाथरी, जिंतुर, परभणी तालुक्यात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या आहेत. जरी अनेक दिवसानंतर पाऊस झाला असला तरीही यामुळे कापसाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. शिवाय परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागाने 10 ते 14 ऑक्टोबर दरम्यान मराठवाड्यातील विविध शहरात वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशाराही दिला आहे. त्यामुळे शेजाऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आज मराठवाड्यातील औरंगाबाद, लातूर, हिंगोली, बीड या जिल्ह्यात जोरदार पाऊस बरसला. तर जालना, उस्मानाबाद जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह तुरळक पाऊस झाला.


अंबरनाथ, बदलापूर आणि ग्रामीण भागात आज विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून वाढत्या तापमानाने त्रासलेल्या लोकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण ठाणे जिल्ह्यात तापमानात वाढ झाली असून उन्हाचे चटके बसत होते. आर्द्रताही वाढल्याने उन्हात फिरताना लोकांचा जीव कासावीस होत होता. मात्र, आज दुपारच्या सुमारास पडलेल्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून उन्हाच्या काहिलीने त्रासलेल्या लोकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.


सिंधुदुर्ग जिल्ह्यात आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर आज पहाटेपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कापलेली भातशेतीत पाणी गेलं आहे. अगोदरच अतिवृष्टीमुळे मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांना परतीच्या पावसाचा फटका बसला आहे. पावसाने विश्रांती घेतल्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी भातशेती कापनीला जोर दिला होता. मात्र, गेल्या तासाभरापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकरी अडचणी येण्याची शक्यता आहे. कापलेलं भात पीक आधीच पाण्यात राहिल्यामुळे त्याला आता कोंब येऊ लागले आहेत. अतिवृष्टीमुळे भात पीक पडून कुजल तर आता परतीच्या पावसामुळे कापलेल भात पीक कुजण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांचेकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यात 9 ते 13 ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यात गडगडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची व विजा चमकण्याची शक्यता वर्तविली होती.


सांगली शहर परिसरात दुपारच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला. आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारी दोनच्या सुमारास पावसाने सुरुवात केली. हा पाऊस साधारणपणे 1 तास सुरू होता. या पडलेल्या मुसळधार पावसामुळे सांगलीकर सुखावले आहेत. पण व्यापारी व छोटे विक्रते याचे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे.


लातूर शहर आणि परिसरात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. आज सकाळपासूनच सर्वत्र ढगाळ वातावरण होते. वातावरणात उकाडा वाढला होता. त्यातच संध्याकाळी पाचच्या आसपास पावसाला सुरुवात झाली. अगोदर हलक्या स्वरूपात असलेला पाऊस नंतर जोरदार सुरू झाला. मागील दहा दिवसांपासून पावसाने उघडीप दिली होती. मात्र, आजचा पाऊस हा जोरदार असल्याने वातावरणात बराच बदल झालेला पाहावयास मिळत आहे. लातूर शहर, लातूर ग्रामीण, निलंगा, वलांडी, अबुलगा, औसा, लामजना, किल्लारी येथील काही भागात पावसाने हजेरी लावलेली पहाव्यास मिळत आहे.


राज्यातील 32 साखर कारखान्यांना 516 कोटींची थकहमी, भाजप, राष्ट्रवादीसह अनेक बड्या नेत्यांच्या कारखान्यांचा समावेश