Marathwada Rain Update:महाराष्ट्रच्या मराठवाडा व कोकण भागात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस जिल्ह्यांना झोडपून काढत आहे. सोलापूर, बीड, हिंगोली आणि लातूरमध्ये शेतकरी, नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झालंय. नदीकाठच्या गावांत शेतजमिनी पाण्याखाली गेल्या, पिकांचे मोठे नुकसान झाले, रस्ते वाहून गेले, पूल उध्वस्त झाले आणि विद्युत पोल आडवे झाले. या परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले आहेत. बीडमध्ये जमिनी अक्षरशः खरडून गेल्या आहेत. लातूर जिल्ह्यातील साठ महसूल मंडळांपैकी 20 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतात पाणी भरलंय.
बीडमध्ये नदीकाठच्या गावांमध्ये शेतजमिनी वाहून गेल्या
बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील घाटशीळ, पारगाव या गावांमधून वाहणाऱ्या किना नदीकाठी शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. नदीकाठच्या शेतजमिनीसह खरिपातील कापूस, तुर, उडीद, सिताफळ, केळी या फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी आता सरकारी मदतीकडे आशा लावून आहेत. आमच्या प्रतिनिधीने या गावातून आढावा घेतला असता, शेतातील पाणी अजून ओसरलेले नाही आणि पीक पूर्णतः नष्ट झालेले दिसत आहे.
हिंगोली: सोयाबीन पिकांचे अतोनात नुकसान
हिंगोली जिल्ह्यातील शेवाळा गावात कयाधू नदीचा पूर शिवारात शिरल्यामुळे सोयाबीनच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अंदाजे पावणेतीन लाख हेक्टर पिकं या मुसळधार पावसामुळे बाधित झाली आहेत. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, सोयाबीन पीक वाहून गेल्याने आता या पिकातून काहीही उत्पादन मिळणार नाही. शेतकऱ्यांना या पिकांचा बाहेर काढण्यासही खर्च करावा लागणार आहे.
लातूर: पूल उध्वस्त, वाहतूक ठप्प
लातूर जिल्ह्यातील साठ महसूल मंडळांपैकी 20 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतात पाणी भरले. जिल्ह्यातील 27 पूल पाण्याखाली गेले, ज्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. हासाळा ते शिंदाळा मार्गावरील पूल गेला असून तावरजा नदीला मिळणाऱ्या ओढ्याचे प्रवाह बदलले. आता पाणी हळूहळू ओसरल्यामुळे वाहतूक पुन्हा सुरळीत झाली आहे, मात्र शेतकरी व नागरिकांना मोठा फटका बसला आहे.
शेतकऱ्यांचं पीक पाण्यात, मैलोनमैल चिखल
सोलापूर, बीड, हिंगोली व लातूरमध्ये शेतकऱ्यांचे पीक पाण्याखाली गेले आहे, त्यामुळे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. शेती पीक, रस्ते, पुलं आणि सार्वजनिक मालमत्तेवर येणारा फटका कोट्यावधी रुपयांचा ठरतो. प्रशासनाने तातडीने पूर प्रतिबंधक उपाययोजना करण्याची आणि शेतकऱ्यांना मदत पोहोचवण्याची गरज आहे.