मुंबई: धुवाँधार पावसानं कोल्हापुरचं कंबरडं मोडलं आहे. सावित्री पुलाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर प्रशासनानं उशिरा का होईना ऐतिहासिक ब्रिटीशकालीन पूल वाहतुकीसाठी बंद केला आहे. तसंच पंचगंगाही झपाट्यानं धोक्याच्या पातळीकडे वाटचाल करत आहे. तब्बल 41 फुटांवर पंचगंगेची पातळी पोहोचली आहे. आणखी 5 इंच पाणी पातळीत वाढ झाल्यास महापूराची स्थिती येऊ शकते. यामुळे कोल्हापूर-रत्नागिरी राज्यमार्ग बंद करण्यात आला आहे.
मुंबई आणि उपनगरांमध्ये रात्रीपासून जोरदार पाऊस सुरु आहे. मुलुंड, भांडूप, पवई, घाटकोपर, अंधेरी, मालाड आणि गोरेगाव परिसरात संततधार आहे. मुंबईबरोबरच ठाण्यातही रिपरिप सुरुच आहे. तर कल्याण डोंबिवलीमध्येही पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत.
दरम्यान, आज मुंबईत समुद्रात सकाळी सव्वा अकरा वाजता उधाणाच्या भरतीचा इशारा देण्यात आला आहे. समुद्राच्या लाटा 4.62 मीटर्स उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. त्यामुळं समुद्र किनारी फिरताना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे.
तर तिकडे पालघर जिल्ह्यातही सर्वदूर पावसाचा जोर कायम आहे. रात्रीपासून सततच्या पावसामुळं सखल भागात पाणी साचल्याचं चित्र आहे. मान्सून सुरु झाल्यापासूनच वरुणराजाची पालघर जिल्ह्यावर मेहेरबानी कायम आहे.
कोकणातही पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असून जिल्ह्यातील खारेपाटण बाजारपेठेत पाणी असल्यामुळे व्यापारी आणि नागरिकांना या पाण्यातून बाजारपेठेचे दैनंदिन व्यवहार करावे लागत आहे.
कोल्हापुरात धुवाँधार पावसानं वाहतुकीचे तीन तेरा, मुंबईतही जोरदार हजेरी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 Jul 2017 10:36 AM (IST)
कोल्हापूरसह मुंबई आणि कोकणातही पावसाची तुफान बॅटिंग सुरु आहे. कोल्हापुरात तर पंचगंगेची पातळी 41 फुटांवर पोहचली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -