Nagpur News नागपूर: नागपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या (Farmers) नावे पैसे लाटण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. नागपूर (Nagpur News) जिल्ह्याच्या कुही तालुक्यामध्ये हा सर्व प्रकार घडला आहे. सरकारने 2022-23 या वर्षासाठी  प्रति हेक्टर 13 हजार 600 रुपये मदत घोषित केली होती. मात्र, नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यामध्ये महसूल अधिकार्‍यांनी व कर्मचार्‍यांनी बोगस शेतकर्‍यांच्या नावे शासनाला सादर करून अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईचे पैसे परस्पर बोगस शेतकऱ्यांच्या नावे वळते केल्याचा धक्कादायक प्रकार शासकीय कागदपत्रांवरून सिद्ध झाला आहे. 


यासाठी मूळ शेतकर्‍यांचा खसरा क्रमांकाचा गैरवापर करण्यात आला असून लाभार्थी शेतकऱ्यांच्या खासरा क्रमांकावर बोगस शेतकऱ्यांचे नाव देण्यात आले आहे. बोगस शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईचे पैसे वळवण्यात आले आहे.सोबतच कुही तालुक्यातील पन्नास टक्के यादी ही बोगस असल्याचा दावा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य भोगेश्वर फेंडर यांनी केला आहे. हा घोटाळा कोट्यावधी रुपयांचा असून याची या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी स्थानिक शेतकर्‍यांनी नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.


 80 टक्के नावे बोगस असल्याचे उघड 


सन 2022- 23 मध्ये नागपूर जिल्ह्यासह विदर्भात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती. त्या अनुषंगाने शासनाने  अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना प्रति हेक्टर 13,600 मदत घोषित केली होती.  त्यात एकट्या कुही तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी 32 कोटी प्राप्त करून दिला. मात्र माहितीच्या आधारे 13 पानांची मिळालेल्या माहितीनुसार जवळजवळ 80 टक्के नावे बोगस असल्याची माहिती समोर आली आहे. यात जवळजवळ पाच कोटी रुपयांचा गैरप्रकार झाला आहे.


यामध्ये संबंधित तलाठी आणि इतर शासकीय अधिकारी, तहसीलदार यांच्या संगनमताने हा गैरप्रकार झाल्याचा आरोप जिल्हा नियोजन समितीचे सदस्य भोगेश्वर फेंडर यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा फटका हा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना बसत असून शासनाच्या मदत निधीपासून हजारो शेतकरी वंचित राहिले आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होऊन दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ही भोगेश्वर फेंडर यांनी  केली आहे. 


शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळवण्याचा हा संपूर्ण प्रकार- अंबादास दानवे


अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांची ही सर्वात मोठी फसवणूक असून  टाळू वरचा लोणी खाणारा हा एकंदरीत प्रकार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष  ज्या शहरातून येतात त्याच नागपूर शहरात हा गैरप्रकार झाला आहे. असे असताना तेथील अधिकार्‍यांवर कुणाचाही धाक नाही आहे का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे. मी स्वतः ग्रामीण भागातला असल्याने मला या संपूर्ण प्रकरणाची माहिती आहे.


खेडापाडातल्या लहान व्यक्तींपासून ते अगदी तलाठ्यांपर्यंत सगळ्या गैर प्रकारामध्ये  संगणमत असतं, त्यामुळे एकमेकांच्या साहाय्यानेच असे सर्व प्रकार घडत असतात. शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळवण्याचा हा संपूर्ण प्रकार असून यावर जातीने लक्ष घालून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केली आहे. त्यामुळे याप्रकरणी आता दोषींवर काय कारवाई होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या