मुंबई : येत्या 24 तासात मुंबई, नवी मुंबई ठाण्यात अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. आधीच सोमवारी झालेल्या पावसाने मुंबईकरांची दैना झाली होती. त्यातच अतिवृष्टीच्या इशाऱ्याने मुंबईकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

हवामान विभागाकडून दिलेला अंदाज लक्षात ठेवून आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागासह पोलिसांनीही मुंबई, नवी मुंबई, ठाणे भागातील नागरिकांना सतर्कतेचं आवाहन केंलं आहे. तसेच आवश्यक असल्यास घरा बाहेर पडावं.

VIDEO | मुसळधार पावसामुळे मुंबईला पुन्हा धडकी ! | स्पेशल रिपोर्ट | एबीपी माझा



मुंबईत सोमवारी सकाळपासून पावसाचा जोर दिसून आला. अनेक ठिकाणी पावसामुळे वाहतूक मंदावली होती. या पावसाने काही काळ विमान सेवा आणि रेल्वे सेवाही विस्कळीत झाली होती. कुर्ला, सायन, अंधेरी परिसरात पावसामुळं वाहतूक कोंडी झाली होती. असल्फा, जागृती नगर, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे मेट्रो स्टेशनच्या बाहेर रस्त्यावर पाणीच पाणी साचल्याचं पाहायला मिळालं होतं.

वांद्रे, दादर, वरळी, परळ, महालक्ष्मी आणि गोरेगावमध्येही जोरदार पाऊस कोसळला. कलानगर परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. रस्त्यावर पाणी आणि खड्डे यामुळे एकूणच वाहतुकीचा वेगही काही काळ मंदावला. विक्रोळी आणि कांजूरमार्ग परिसरात जोरदार पावसामुळं काही काळ ट्रॅकवर पाणी साचलं होतं. रस्त्यावरील वाहतूक मंदावली असताना रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील लोकल सेवा 10 ते 15 मिनिटं उशिरानं सुरु होती.


जुलै महिन्यातील सरासरी पाऊस

जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच मुंबई शहर आणि परिसरात संपूर्ण जुलै महिन्याचा सरासरी पाऊस झाला आहे. काल सकाळी मुंबईच्या सांताक्रूझ परिसरात सकाळी 8.30 पासून पुढे तीन तासात 108 मिमी, तर नवी मुंबईत 90 मिमीहून अधिक पावसाची नोंद झाली.

मुंबईत दरवर्षी जुलै महिन्यात एकूण 840 मिमी पावसाची नोंद होते. मात्र, सोमवारी रात्रीपर्यंतच मुंबईत एकूण 708 मिमी पावसाची नोंद झाली होती. कालच्या पावसामुळे मुंबईतली हवाई वाहतूक संध्याकाळी 7 पर्यंत उशिरानं सुरु होती.