मुंबई : राज्यभरात सध्या परतीच्या पावसाने हाहाकार माजवला आहे. गेल्या 48 तासात वीज पडून राज्यातील विविध ठिकाणी 25 जणांचा मृत्यू झाला आहे. बीड जिल्ह्यातील चारदरी भागात 10 जणांच्या अंगावर वीज पडली. यापैकी 5 जणांचा मृत्यू झाला.


दुसरीकडे पंढरपूर, बारामती, शिर्डीमध्ये वीज पडून तिघांचा मृत्यू झाला. तर रायगडमध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. शिवाय बुलडाणा जिल्ह्यातील डोनगावमध्येही एका शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाला. बारामतीमध्ये रानात चरण्यासाठी गेलेल्या मेंढपाळासह त्याच्या कळपातील 7 मेंढ्यांचा वीज पडून मृत्यू झाला.

त्यामुळे महत्वाचं काम असेल तरच भर पावसात घराबाहेर पडा. दरम्यान आजही हवामान खात्याने मुंबईसह राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे.

सध्या अकोला, सोलापूर, पालघर आणि कोकणचा काही भाग तसंच विदर्भातील अनेक भागात पावसाचा जोर पाहायला मिळत आहे. परतीचा पाऊस पिकं आणि जनावरांच्या जीवावरही उठला आहे.

पालघरमध्ये कापणीला आलेल्या भाताचं मोठं नुकसान झालंय. तर विदर्भातही सोयाबीनचं मोठं नुकसान झालंय. हातातोंडाशी आलेलं पीक वाया गेल्याने शेतकरी हवालदील झाला आहे.

जिल्हानिहाय वीज पडून मृत्यू :

  • सोलापूर – 2

  • पालघर – 4

  • धुळे – 3

  • जालना 2

  • मुंबई – 1

  • अहमदनगर – 3

  • पंढरपूर – 1

  • महाड- 2

  • बुलडाणा – 1

  • बीड – 5

  • वाशिम - 1