मुंबई : 16 जिल्ह्यांमधील 3 हजार 131 ग्रामपंचायतींच्या थेट सरपंचपदासह सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज (शनिवार) प्राथमिक अंदाजानुसार सरासरी 79 टक्के मतदान झाल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली.


सहारिया यांनी सांगितले की, ‘सध्या राज्यातील सुमारे साडेसात हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू आहे. त्यातील काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. उर्वरित 3 हजार 131 ग्रामपंचायतींसाठी आज सरासरी 79 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

सर्व ठिकाणी 9 ऑक्टोबर 2017 रोजी मतमोजणी होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात विविध 18 जिल्ह्यांतील सुमारे 4 हजार 119 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासह सदस्यपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 16 ऑक्टोबर 2017 रोजी मतदान होईल.