मुंबई/सातारा : मागील दोन दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी परतीचा पाऊस सुरु आहे. आजही राज्यभरात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. प्रामुख्याने सातारा, कोल्हापूर, पुणे आणि नाशकात जोरदार पाऊस सुरु असून साताऱ्यात अनेक ठिकाणी पाणी साचले आहे.


दरम्यान, पुढील 48 तासांत मध्य महाराष्ट्रासह मुंबई, कोकणात जोरदार पाऊस बरसेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे उद्याच्या मतदानावर याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सातारा आणि पुणे शहरात कालपासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक रस्त्यांवर पाणी साचलं आहे, परिणामी रात्री मोठी वाहतूक कोंडी पहायला मिळत होती. आजही साताऱ्यासह कोल्हापूर आणि पुण्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. पुणे-बंगळुरु महामार्गावरही पाणी साचलं आहे.

दरम्यान, सिंधुदुर्गमधील फोंडा परिसरात ढगफुटीसदृश्य पाऊस सुरु आहे. नदी आणि ओढ्यांना पूर आल्याचे पाहायला मिळत आहे. सिंधुदुर्गात भातकापणी सुरू आहे. अशातच सुरु झालेल्या मुसळधार पावसामुळे भातशेतीचं नुकसान झालं आहे.

विदर्भात दिवसभरात काही ठिकाणी पावसाच्या रिमझिम सरी येऊन गेल्या. अद्यापही ढगाळ वातावरण कायम आहे.