मुंबई : सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. यंदा नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह पाहण्यास मिळत आहे. तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक व्यक्तीने  मतदानाचा हक्क बजावला पाहिजे यासाठी निवडणूक आयोगातर्फे अनेक उपक्रम हाती घेण्यात आले आहे. प्रशासनाबरोबरच आता हॉटेल व्यावसायिक, विविध सामाजिक संस्थाकडून देखील मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी  शक्कल लढवली आहे.


मतदान करा आणि सूट मिळवा किंवा मोफत घ्या अशा विविध प्रकारच्या ऑफर अनेक ठिकाणी पहावयास मिळत आहे. अशीच वेगळी ऑफर सध्या पैठणीचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येवले शहरात दिली आहे. ‘लोकशाहीचा बाळगू अभिमान, चला करु मतदान...मतदान करा आणि पैठणीवर विशेष सूट मिळवा’ अशी ऑफर  येवला शहरातील कापसे पैठणीतर्फे देण्यात आली आहे.  उद्या मतदान करून जे लोक पैठणी खरेदी करण्यास येतील त्यांना पैठणी खरेदी केल्यावर  15 टक्के सूट देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे ही सूट 21 ते 24  तारखेपर्यंत म्हणजे मतमोजणीच्या दिवसापर्यंत ठेवण्यात आली आहे.

Discount on voting | मतदान केल्यास 50 टक्के सूट, दाढी आणि कटिंगवर सूट | नाशिक | ABP Majha



कोल्हापुरातील लक्ष्मी मिसळच्या मालकांनी ‘मतदान केल्याची शाई दाखवा आणि 10 टक्के सूट मिळवा तर मतदान करा’ अशा पद्धतीचा उपक्रम राबवण्याचं नियोजन केलं आहे. कोल्हापूर हा नेहमीचं सर्वाधिक मतदान करणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यामध्ये आणखी भर पडावी यासाठी हा प्रयत्न असल्याचं लक्ष्मी मिसळच्या मालकांनी सांगितलं आहे.

नागपूर जिल्हा प्रशासनानं यावर एक अनोखी ऑफर दिलीये. मतदान करा आणि पेंच व्याघ्र प्रकल्प असलेल्या क्षेत्रातील रिसॉर्ट-हॉटेल्समध्ये सूट मिळवा, अशी ऑफर दिली आहे. बोटावर मतदान केल्याचं निशाण दाखवल्यावरच १० ते २५ टक्क्यांपर्यंत ही सूट मिळेल, असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

नाशिकच्या रामवाडी परिसरातील प्रभाकर सैंदाणे या सलून व्यावसायिकाने देखील 'मतदान करा आणि ५० टक्के सूट मिळवा' असे आवाहन नागरिकांना केले आहे. बोटाची शाई दाखवल्यावर 2  दिवस  कटिंग आणि दाढीवर ही सूट देणार आहे. दुकानाबाहेर त्यांनी तसे फलक लावले आहे.