Rain update : मुंबई : राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात झाली असून मध्यरात्रीपासूनच ढगांच्या गडगडाटासह पाऊस सुरू झाला आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातही पावसाने (Rain) जोरदार हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुणे, सोलापूर, सांगली, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, हिंगोली, परभणीसह अनेक जिल्ह्यात वरुणराजाचं आगमन झालं आहे. मात्र, या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं (Farmers) नुकसान होत असून अनेक ठिकाणी फळबागा धोक्यात आल्या आहेत. तर, काही ठिकाणी खरीपची पिकेही पाण्यात गेल्याचं चित्र आहे. पुणे (Pune) शहरात अचानक दुपारी आलेल्या मुसळधार पावसामुळे पुणेकरांची चांगलीच दमछाक झाली. पुणे शहरासह ग्रामीण भाग, त्याचबरोबर धरण क्षेत्रात देखील पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यानंतर, पुण्यातील टिळक रस्त्यावर पाणी साचलं होतं, अनेक रस्त्यांवर पाणी साचलेलं असून रस्त्यांवर स्लो ट्रॅफिक पाहायला मिळतंय. 


हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील तीन ते चार दिवस असाच पाऊस पुणे शहर आणि आजूबाजूच्या परिसरात असणार आहे. तसेच, राज्यातील विविध भागात पुढील 3 ते 4 दिवस पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. 


सांगलीत पावसाची दमदार एंट्री


सांगली शहरासह जिल्ह्याच्या अनेक तालुक्यात मुसळधार पावसाचे दमदार आगमन झाले. जिल्ह्यातील तासगाव, पलूस तालुक्यासह खानापूर माथ्यावर अनेक भागात सलग पाऊस झाला आहे. सलगच्या पावसामुळे कृष्णा नदीही दुथडी भरून वाहू लागली. या पावसामुळे द्राक्ष बागांमध्ये पाणी साचून राहू लागले, द्राक्ष बागाची फळ छाटणी खोळंबली असून छाटलेल्या द्राक्षबागा वांझ जाण्याची भीती द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आहे. 


परभणी शहरासह जिल्ह्यात जोरदार पाऊस


एका दिवसाच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. दुपारच्या सुमारासह विजांच्या गडगडाटासह वादळी वारे आणि जोरदार पावसाला सुरुवात झाली.अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचायला सुरुवात झालीय. ऐन सोयाबीन काढणीच्या हंगामात पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांच्या हातात जे उरले आहे, तेही हातातून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


हिंगोली जिल्ह्यात सोयाबिनला फटका


हिंगोली जिल्ह्यांमध्ये आज दुपारनंतर जोरदार स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली आहे. कालपासून हिंगोली जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण होते, आज दुपारी तापमानात सुद्धा वाढ झाली होती. मात्र, आता जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. उकाड्याने त्रस्त झालेल्या हिंगोलीकरांना या पावसामुळे दिलासा मिळाला आहे. परंतु शेतातील काढणीला आलेल्या सोयाबीनच्या पिकाला या पावसाचा मोठ्या प्रमाणात फटका बसतोय. अनेक ठिकाणी सोयाबीन कापणीचे काम सुरू आहे, परंतु पावसाने हजेरी लावल्यामुळे कापलेले सोयाबीन पाण्यामध्ये भिजताना दिसून येते.


सिंधुदुर्गात ढगफुटीसदृश्य पाऊस


सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडीतील भुईबावडा घाटात काल ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळल्याने घाटात बारा ठिकाणी दरडी तर दोन ठिकाणी संरक्षक भिंत खचून वाहतूक बंद झाली. गेल्या 20 तासांपेक्षा जास्त काळापासून भूईबावडा घाटातील वाहतूक बंद आहे. तसेचस दरड हटविण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू असून जेसीबीच्या साहाय्याने घाटातील दरड बाजूला करण्यात येत आहे.


रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस


रायगड जिल्ह्याला पुढील काही तासात जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. रायगड जिल्ह्याला आज ऑरेंज तर उद्या रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. माणगाव, महाड, म्हसळा आणि श्रीवर्धन तालुक्यातदेखील आज मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. 


पालघार जिल्ह्यात रेड अलर्ट


पालघर जिल्ह्यात कालपासून अधून-मधून विजांच्या कडकडाटासह पाऊस होत आहे. हवामान खात्याकडून आज यलो, उद्या ऑरेंज आणि परवा रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे मोठा पाऊस झाल्यास पिकून आलेल्या हळव्या भातशेतीचे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.