Nanded Rain : नांदेड (Nanded) जिल्ह्यात आज सकळपासून मुसळधार पाऊस  (Rain)सुरु झाला आहे. दिवाळीच्या आनंदी वातावरणात शेतकऱ्यांसमोर या पावसामुळं संकट उभं राहिलं आहे.  आभाळ फाटल्याची स्थिती नांदेड जिल्ह्यात झाली आहे. या मुसळधार पावसामुळं शेतकऱ्यांची पिकं मातीमोल झाली आहेत. गेल्या 15 दिवसांपासून परतीच्या पावसाची रिपरिप सुरु झाली आहे. काही ठिकाणी पिकांची काढणी सुरु आहे, अशातच पाऊस सुरु असल्यानं शेती कामांचा देखील खोळंबा झाला आहे.


गेल्या 15 दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरु आहे.या सततच्या पावसामुळं काढणीस आलेली सोयाबीन, उडीद, मूग, कापूस ही पिकं मतीमोल झाली आहेत. त्यामुळं ऐन दिवाळीत सुरु असलेल्या या सततच्या पावसामुळं पिकांचं मोठं नुकसान होऊन शेतकऱ्यांच्या दिवाळी सणवार विरजण पडलंय.


या तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी


नांदेड जिल्ह्यात परतीच्या पावसामुळं पिकं मातीमोल होण्याची वेळ आली आहे. कारण गेल्या दोन आठवड्यापासून परतीच्या पावसाची रिपरिप सुरु आहे. आज सकाळपासून नांदेड जिल्ह्यातील अर्धापुर, भोकर, देगलूर, बिलोली या तालुक्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे पिकात अक्षरशः पाणीच पाणी झालं आहे. त्यामुळं हातची आणि काढणीस आलेली पिकं मातीमोल झाली आहेत. एकीकडं दिवाळी सणाचा उत्साह, आनंद सुरु असताना शेतकरी मात्र संकटात आहे. अद्याप काही ठिकाणी नुकसानीचे पंचनामे झाले नाहीत. दुसरीकडे शेतकऱ्यांना सरकारकडून अद्याप मदतही मिळाली नाही. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. दरम्यान, दुसरीकडं शेतकरी सोयाबीन पाण्यातून काढताना दिसत आहेत. बऱ्यापैकी सोयाबीनचे पिक वाया गेलं आहे. सध्या शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर, फाटके कपडे आणि डोळ्यात अश्रू आहेत.


सततच्या नुकसानीमुळं शेतकरी उचलतायेत टोकाचं पाऊल


पावसामुळं होणाऱ्या नुकसानीमुळं शेतकरी टोकाचं पाऊल उचलताना दिसत आहेत. मराठवाड्यात परभणी जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांना आत्महत्या केल्या आहेत. तसेच नांदेड जिल्ह्यात एक, बीड जिल्ह्यात एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली आहे. पिकांचे होणार नुकसन आणि वाढत जाणारा कर्जबाजारीपणा यामुळं शेतकरी सतत चिंतेत आहेत. यातूनच आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलत आहेत.


15 दिवसात मदत करण्याचं कृषीमंत्र्यांचं आश्वासन


गेल्या तीन-चार दिवसांपासून होत असलेल्या परतीच्या पावसामुळे मराठवाड्यात मोठ्याप्रमाणावर शेत पिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केली. परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करावे असे निर्देश कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांना दिले. पंचनामा करीत असतांना एकही नुकसानग्रस्त शेतकरी पंचनामा अभावी मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना सत्तार यांनी दिल्या. तर पंचनाम्यानंतर 15 दिवसांत मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याची माहिती यावेळी अब्दुल सत्तार यांनी दिली आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Abdul Sattar: कृषिमंत्र्यांकडून मराठवाड्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी; पंचनाम्यानंतर 15 दिवसांत मदत