Heavy Rain In Kokan : राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळतोय. या पावसाचा सर्वाधिक जोर मुंबई, मुंबई उपनगर, कोकणासह विदर्भात बघायला मिळत आहे. अशातच गेल्या 48 तासापासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यातील प्रमुख नद्या या दुथडी भरून वाहू लागलेल्या आहेत. परिणामी पोलादपूर तालुक्यातून वाहणाऱ्या सावित्री नदीने देखील या भागात धोक्याची पातळी (Flood) ओलांडली असून प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.


पोलादपूर तालुक्यातील निवे ताम्हाणे रस्त्यावर झालेल्या मुसळधार पावसात दरड कोसळली असून येथील वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे. आपत्तीच्या काळात मदत कार्य करण्यासाठी NDRF टीम, रेस्क्यू टीम यांना अलर्ट राहण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. दुसरीकडे या पावसाचा फटका रत्नागिरी जिल्ह्याला देखील बसला आहे.  रत्नागिरी-चांदेराई पुलावरून पाणी गेल्याने लांजा - रत्नागिरी दरम्यान वाहतूक सेवा बंद झाली आहे. 


कोल्हापूरातील पंचगंगा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल 


पावसाची अशीच काहीशी परिस्थिती कोल्हापूरात देखील बघायला मिळाली आहे. कोल्हापूरातील पंचगंगा नदी आता इशारा पातळीकडे वाटचाल करत आहे. सध्याची पाण्याची पातळी 37.3 फुटांवर आहे.  शिवाय जिल्ह्यातील तब्बल 84 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे पंचगंगा नदी पात्र सोडून सध्या वाहताना दिसत आहे. याच पंचगंगा नदीचे छत्रपती शिवाजी महाराज पूल आणि राजाराम बंधारा मर्यादा ओलांडण्याच्या परिस्थितीत आहे. जिल्ह्यात सध्या पावसाचा जोर वाढला असून आज दिवसभरात सुद्धा मोठ्या प्रमाणात पावसाने बॅटिंग केलीये. तर उद्या सुद्धा पावसाचा जोर कायम राहील, असा अंदाज आहे.  त्यामुळे नदीच्या पाणीपातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.


रायगडच्या कुंडलिका नदीला पूर


कालपासून कोकणासह रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळतोय. दोन दिवस रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. काल झालेल्या मुसळधार पावसात अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत. रोहा येथील कुंडलिका नदी देखील इशारा पातळीच्या बाहेर गेल्याने येथील नागरिकांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. या नदीकिनारी असलेल्या अनेक गावांना पाण्याचा धोका निर्माण होऊ नये, याकरिता प्रशासन देखील अलर्ट मोडवर आल्याचे पाहायला मिळते.


गुहागरमध्ये सकाळपासून जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नद्यांना पूर. कोतळूकमधील नदीला पूर आल्याने रत्नागिरीकडे जाणाऱ्या मार्गावर पाणीच पाणी दिसत आहे. सतत सुरु असणाऱ्या पावसामुळे रस्ते वाहतुकीवर परिणाम होऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे.


इतर महत्वाच्या बातम्य